घर उत्तर महाराष्ट्र थकीत घरभाडे मिळवून देण्याच्या बदल्यात लाच; आदिवासी विकास प्रकल्पाचा लेखाधिकारी अटकेत

थकीत घरभाडे मिळवून देण्याच्या बदल्यात लाच; आदिवासी विकास प्रकल्पाचा लेखाधिकारी अटकेत

Subscribe

नाशिक : शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहासाठी भाडेतत्वावर दिलेल्या इमारतीचे थकीत घरभाडे बिलाच्या पडताळणीसाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधिक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१८) लेखाधिकार्‍यास अटक केली. भास्कर रानोजी जेजुरकर (रा. कुलस्वामिनी रो हाऊस, नंबर 2, भवानी पार्क, भगवती नगर, हिरावाडी, नाशिक) असे अटक केलेल्या लेखाधिकार्‍याचे नाव आहे.

भास्कर जेजुरकर हा आदिवासी विकास प्रकल्प नाशिकमध्ये वर्ग दोनचा लेखाधिकारी आहे. ३७ वर्षीय तक्रारदाराच्या मालकीचे आंबोली (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील गट क्रमांक 79/2 व 79/3 मध्ये इमारत क्रमांक 422/1,422/2 असे दोन वसतिगृह आहेत. त्यापैकी 422/1 ही 99 हजार 998 रुपये मासिक दराने आणि 422/2 ही इमारत मासिक 55 हजार 88 रुपये मासिक दराने तक्रारदारांच्या वडिलांनी २021 ते 2024 या कालावधीसाठी शासकीय आश्रमशाळा, आंबोली यांना भाडेतत्त्वावर दिले आहे.

- Advertisement -

त्यापैकी इमारत क्रमांक 422/1 चे एप्रिल ते जून 2023 या तीन महिन्यांचे एकूण भाडे 2 लाख 93 हजार 994 रुपये आणि इमारत क्रमांक 422/2 चे एप्रिल ते जून 2023 या तीन महिन्यांचे एकूण भाडे 1 लाख 65 हजार 264 रुपये असे दोन्ही इमारतीचे मिळून एकूण 4 लाख 59 हजार 258 रुपये थकीत भाडे आहे. हे भाडे मिळण्यासाठी बिले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक यांच्याकडे पाठविण्यासाठी लेखा अधिकारी भास्कर रानोजी जेजुरकर याच्याकडे पडताळणी करण्यासाठी प्रलंबित होते.

या बिलांची पडताळणी करून प्रकल्प अधिकारी, नाशिक यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी भास्कर जेजुरकर याने गुरुवारी (दि.17) १० हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. जेजुरकर याने तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाचेची रक्कम शुक्रवारी (दि. 18) कार्यालयाच्या आवारात स्विकारली. याप्रकरणी जेजुरकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -