माणुसकीचा पूल:आदित्य ठाकरेंवर अभिनंदनाचा वर्षाव

सावरपाड्याच्या ग्रामस्थांनी साधला ऑनलाईन संवाद

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सावरपाडा येथील तास नदीवर काही तासांतच लोखंडी पूल बांधून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्परता दाखविल्यानंतर या परिसरातील महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास थांबला. यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आभार व्यक्त करण्यास ग्रामस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामस्थांशी ऑनलाइन चर्चा केली.

नंतर माणुसकीचे दर्शन घडवित पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून जलमिशन योजनेंतर्गत 1.58 कोटी रुपये मंजूर करून दिल्याने आता सवरपाडासह 12 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आणि आदित्य ठाकरे यांना त्यांनी धन्यवाद दिले.

सावरपाडा येथील तास नदीवरून पिण्याचे पाणी आणतांना महिलांना तसेच या नदीवरून ये-जा करतांना ग्रामस्थ,विद्यार्थी यांना दररोज कराव्या लागत असलेल्या जीवघेण्या कसरतीचे लागत होती. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तत्काळ त्याची दखल घेत मुंबईहून युवासेनेच्या पदाधिकार्‍यांना तेथे पाठवत सावरपाडा येथील आदिवासी बांधवांचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्यांच्या आदेशानंतर शिवसेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या शिष्टमंडळाने सरपंच दळवी व ग्रामस्थांसमक्ष लोखंडी पुलासाठीची साडेबारा हजार रक्कम रोख स्वरूपात ठेकेदार दत्ता पवार यांच्याकडे सुपूर्द केली.

त्यानंतर तो पूल अवघ्या काही तासातच केल्याने सावरपाड्याच्या ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास थांबला.त्यानंतर या परिसराच्या पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलून मंत्री आदित्य ठाकरे यांनी माणुसकीचे जे आगळे दर्शन घडविले त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जल जीवन योजना मिशन अंतर्गत एक कोटी 58 लाख मंजूर झाल्याने खरशेतसह खरपाडी, शेंदीपाडा, चिखलीपाडा,सदरपाडा,सावरपाडा, शेंद्रीपाडा आदी 12 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

मंत्री ठाकरे व ग्रामस्थांच्या ऑनलाइन संवादाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, युवा सेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, त्र्यंबकेश्वर शिवसेना पदाधिकारी कल्पेश कदम, सरपंच विठ्ठल दळवी, ग्रामपंचायत सदस्य रूगनाथ गाखुंडे, अंबादास गांगुर्डे तसेच ग्रामस्थ पांडुरंग दहा वाढ,नामदेव कनोजे, मल्हार गांगुर्डे, दिलीप दळवी, अमृत राऊत, विठ्ठल दळवी, भावडू दाहवाड, आबादास गांगोडे, लताबाई दाहवाड, कपिला दाहवाड, कुसूम घटळे उपस्थित होते.