हळदीच्या पूर्वसंध्येलाच युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पत्रिका वाटपासाठी गेला अन् घात झाला; अज्ञात मारेकर्‍यांचा शोध सुरू

brutal murder
रोजच्या मारहाणीला कंटाळला, अखेर अल्पवयीन मुलाने जन्मदात्यावर चालवली कुऱ्हाड

इगतपुरी : तालुक्यातील माणिकखांब येथील २६ वर्षीय युवकाचा मृतदेह शनिवारी (दि. १) आढळून आला. अज्ञात मारेकर्‍यांनी या युवकाच्या डोक्यावर कठीण हत्याराने प्रहार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नवरदेव युवकाच्या हळदीच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घोटी पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात मारेकर्‍यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गजानन हरिश्चंद्र चव्हाण (वय २६, रा. माणिकखांब) असे मृत युवकाचे नाव असून उद्या त्याचा लग्नसोहळा होता. त्याच अनुषंगाने लग्नपत्रिका वाटण्यासाठी घराबाहेर पडला होता. दरम्यान, शनिवारी (दि. १) सकाळी या युवकाचा मृतदेह शेनवड बु. पाझर तलावाजवळ पाटीलवाडी शिवारात आढळून आला. अज्ञात मारेकर्‍यांनी अज्ञात कारणावरून या युवकाच्या डोक्यावर, कपाळावर कठीण हत्याराने प्रहार करून जीवे ठार मारले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्र कुटे, घोटीचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. मृत युवकाच्या मारेकर्‍यांचा शोध घेणे व लवकरच त्यांना जेरबंद करणे हे पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे ठाकले आहे. या खुनामागचे कारण काय, अज्ञात मारेकरी कोण, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, मृत युवकाचे वडील हरिश्चंद्र गणपत चव्हाण (वय ५५, रा. माणिकखांब) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास घोटीचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक संजय कवडे, हवालदार शीतल गायकवाड, प्रकाश कासार, कोरडे, लहू सानप, सुहास गोसावी, चव्हाण आदी करीत आहेत.