टोळक्याची भुरटेगिरी, फुकट नाश्ता दिला नाही म्हणून स्वीटच्या दुकानात धुडगूस, कामगारालाही मारहाण

नाशिक : नाशिक शहरातील सातपूर भागातील सुप्रसिद्ध अशा अंबिका स्वीट्स या मिठाई व खाद्यपदार्थांच्या दुकानात एका फुकट नाश्ता दिला नाही म्हणून टोळक्याने या दुकानात तोडफोड केली. तसेच दुकानातील कामगारांना मारहाण देखील केली आहे. सातपूर येथील अंबिका स्वीटस या दुकानात घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

नाशिक शहरात मागील काही महिन्यात गुन्हेगारी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे पोलिसांचा गुन्हेगारांवर कुठल्याही प्रकारे वचक राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सातत्याने कोयता गॅंगची दहशत, जीवघेणे हल्ले, टवाळखोरांची धुडगूस, हत्या अशा घटनांनी नाशिक शहरात धुमाकूळ घातला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने या सर्व गोष्टींवर पायबंध घालण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या सर्व उपाययोजना तुटपुंजा ठरत असल्याची परिस्थिती शहरात दिसून येत. कारण, शहरात सातत्याने गुन्हेगारी कारवाया या सुरूच आहेत. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर कुठला वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शहरात चौका चौकात टोळक्याने उभे राहून तसेच धुडगूस घालण्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यातच सातपूर भागातील सुप्रसिद्ध अशा अंबिका स्वीट्स या मिठाई व खाद्यपदार्थांच्या दुकानात फुकट नाष्टा न दिल्याचा चा राग आल्याने एका टोळक्याने या दुकानात धुडगूस घातला तेथे तोडफोड केली. तसेच तेथील कामगारांना देखील मारहाण केली आहे. विशेष म्हणजे हे दुकान सीसीटीव्ही च्या देखरेखी खाली आहे व ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

फ्रीमध्ये कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही, म्हणून थेट व्यावसायिक तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाणी करण्यात आलेली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओमध्ये दहशत वाजवणारे टोळके व्यावसायिकला मारहाण करण्याबरोबर स्वीटमधील साहित्य अस्ताव्यस्त करताना दिसत आहे. घटनेची माहिती सातपूर पोलिसांना कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अवघ्या काही तासांतच संशयितांना ताब्यात घेतले आहे. आपण सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहोत हे माहीत असूनही या टोळक्याची इतकी हिंमत झाली याचाच अर्थ गुन्हेगारांचे बळ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.

टोळक्याच्या म्होरक्याना अटक  

दरम्यान अशा प्रकारे भाईगिरी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणारे टोळके आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सातपूर पोलिसांनी केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासातच या संशयित टोळक्याला जेरबंद करण्यात आलेले असून पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस अंमलदार अनंता महाले, संभाजी जाधव, रोहिदास कनोजे यांच्या टीमने तातडीने ही कारवाई केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी सातपूर येथील अभिषेक बेकरी या ठिकाणी भर दिवसा केक फ्री दिला नाही, म्हणून कोयता काढत व्यावसायिकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. यावेळी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत सातपुर परिसरातून संशयितांची धिंड काढली होती.