दिवाळी बंपर भेट! नाशिकच्या महिंद्रा कंपनी कामगारांना भरघोस बोनस जाहीर

कायम असलेल्या २१०० कामगारांना यंदा ५५ हजार ते १ लाख १२ हजार ३२४ रुपये बोनस

Diwali Bonus M&M

सातपूर – नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमधील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्या कामगारांना भरघोस बोनस जाहीर केला आहे. महिंद्रा अँन्ड महिंद्रा एम्प्लॉइज युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात झालेल्या यशस्वी चर्चेनंतर कायम असलेल्या २१०० कामगारांना यंदा ५५ हजार ते १ लाख १२ हजार ३२४ रुपये बोनस सेवा जेष्ठतेनुसार मिळणार आहे. कोरोना संकटकाळ व ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीच्या काळातही व्यवस्थापन आणि युनियन यांच्यातील यशस्वी चर्चेमुळे सर्वाधिक बोनस दिल्याचा दावा युनियनने केला आहे.

महिंद्रा कंपनीच्या बोनसकडे औद्योगिक क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून होते. बोनसबरोबर वेतनाची रक्कमही एकत्र मिळणार असल्याने कामगारांसह, त्यांच्या कुटूंबातही आनंदाचे वातावरण आहे. युनियनतर्फे अध्यक्ष एन. डी. जाधव, उपाध्यक्ष संजय घुगे, जनरल सेक्रेटरी संजय घोडके, सेक्रेटरी जितेंद्र सूर्यवंशी, जॉईंट सेक्रेटरी अजित थेटे, खजिनदार सचिन मोरे, सदस्य प्रकाश माळी, संतोष सावकार यांनी व्यवस्थासोबत यशस्वी चर्चा केली.