नाशिक शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच, पुन्हा तीन ठिकाणी डल्ला

नाशिक : शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढतच असताना आता पुन्हा भद्रकालीसह इंदिरानगर आणि नाशिकरोड भागात ती ठिकाणी घरफोड्या झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने तसेच रात्रीच्या वेळेस अनेक भागांत अंधाराचे साम्राज्य असल्याने चोरटे या संधीचा फायदा घेऊन चोर्‍या करत असल्याचे दिसून येत आहे.

इंदिरानगर परिसरात सातत्याने घरफोड्यांचे सत्र सुरू असून, विलास भालचंद्र पत्की (वय ६८, रा. फ्लॅट नं. १३, निरामय बंगला, राजीवनगर, इंदिरानगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरी नुकतीच चोरी होऊन २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाल्याचे दिसून येते. या घटनेत चोरट्यांनी पत्की यांच्या घराच्या टेरेसवर चढून तेथील दरवाजाचा पत्रा तोडून घरात प्रवेश करून १५ हजार रुपयांची चांदीची भांडी, अडीच हजार रुपये किंमतीची तांब्याची वेगवेगळी भांडी, दोन हजार रुपये किंमतीची पितळाची वेगवेगळी भांडी, हजार रुपये किंमतीची सोन्याची लहान गौरीची मंगळसुत्रे असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचबरेाबर या चोरट्यांनी त्यांच्या बंंगल्याशेजारील सुरेश दगडोबा पवळे (रा. मानद अपार्टमेंट) यांच्याही घराचे कुलून तोडून संसारसाहित्य चोरल्याचे म्हटले आहे. त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक बोराडे हे पुढील तपास करत आहेत.

दुसर्‍या एका घटनेत, नाशिकरोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनता हार्डवेअरच्या बाजूला असलेल्या गोविंद राजेंद्र टोकसे (वय ३३, रा. उपनगर, मधुबन पार्क) यांच्या मोबाईलच्या दुकानाच्या छताचे पत्रे रात्रीच्या सुमारास कापून दुकानात प्रवेश करत तब्बल ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी विविध कंपन्यांचे नवीन मोबाईल, हेडफोन यासह स्मार्ट वॉच असा ६६ हजार ७९८ रुपयांचा मुद्देमाल चोरला. यात चोरट्यांनी रिपेअरिंगसाठी आलेल्या अंदाजे २५ हजारांचे मोबाईलही लंपास केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक ए. के. जगताप अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, तिसर्‍या घटनेत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बँक फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरट्याने प्रवेशही केला मात्र कुठलाही ऐवज चोरण्यात तो अपयशी ठरला. कैलास सदाशिव कोठुळे (वय ५२, रा. सोनाई निवास, दत्त नगर, पेठरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ते कार्यरत असलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयासमोरील दी जनलक्ष्मी सहकारी बँक लि. मध्ये अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि. १६) रात्रीपासून ते सोमवार (दि. १८) सकाळच्या सुमारास मागील बाजूची खिडकी तोडून प्रवेश केला. मात्र, त्यांना कुठलाही ऐवज चोरून नेण्यात यश आले नाही. सोमवारी नेहमी प्रमाणे कोठुळे हे कामावर बँकेत आले असता त्यांना लाकडी कपाटांचे दरवाजे, टेबल्सचे ड्रॉवर उघडलेले दिसून आले. शिवाय बँकेची कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली दिसून आली. यावरून कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी बँकेत शिरून चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी हे याप्रकरणी तपास करत आहेत.

या घटनाही पोलिसांपुढे आवाहन

इंदिरानगर परिसरातील चेतनानगरला दोन ठिकाणी घरफोड्या होऊन अंदाजे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनानगरमध्ये राहणारे राजेंद्र येवला यांच्या फ्लॅटच्या बेडरूममधील उघड्या खिडकीतून प्रवेश करत चोरट्यांनी लाकडी कपाटाचा दरवाजा तोडून दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वडाळा शिवारातून 2 लाख १९ हजारांचा ऐवज चोरीस

वडाळा शिवारात वृंदावन कॉलनीत रो-हाऊसमध्ये राहणारे अमन मौर्या हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुलीला शिकवणीसाठी सोडायला गेले असता त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोख एक लाख रुपयांच ऐवज असा एकूण दोन लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचे दिसून आले. मौर्या यांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.