प्रेयसीला रमजान गिफ्ट देण्यासाठी घरफोडी

जळगाव : सिंधी कॉलनीतील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून अडीच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण सात लाखांची घरफोडीची घटना घडली होती. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन विधिसंघर्षित बालकांसह दोन अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले. अटकेतील गुन्हेगारांच्या टोळीच्या म्होरक्याच्या प्रियसीचे नखरे उचलण्यासाठीच अटकेतील समीर काकर याने घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

शहरातील सिंधी कॉलनीत समाधा आश्रमजवळील कंवरनगरातील रोहित इंद्रकुमार मंधवानी कुटुंबीयांसह शुक्रवारी अमरावती येथे गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घरी परतले. तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला. घरात शिरल्यावर हॉल, बेडरुम, किचन व स्टोरमधील संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले होते. तसेच कपाटात ठेवलेले सात तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपयांची रोकड कपाटातून लंपास होती. सोन्याचे व चांदीचे दागिने, मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या व्हीएचए कंपनीच्या ४० मिक्सरच्या मोटारीदेखील चोरीस गेल्या होत्या. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेने तीन संशयितांना गुप्त माहितीवरून ताब्यात घेतले.

प्रेयसीच्या नखऱ्यांसाठी…

म्होरक्या समीर काकर आणि अन्सार या दोघांचेही परिसरात प्रेमप्रकरण सुरू आहे. त्यातील समीरने त्याच्या प्रेयसीकरिता महागडा ड्रेस, चप्पल व इतर शॉपिंग करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यातच सिंधी कॉलनीतील मंधवानी यांच्या घराची टीप त्याला मिळाली. मागचा-पुढचा विचार न करता त्याने तिघांना सोबत घेत घरफोडी केली. त्यात दोन लाखांची रोकड हाती लागल्याने प्रत्येकाच्या हिश्श्यावर पन्नास हजार रुपये आले. त्याच दिवशी त्याने शहरातील एका मोठ्या शोरुममधून त्याच्या प्रेयसीकरिता महागडा ड्रेस खरेदी केला. तसेच इतरही शॉपिंग करून दिल्याचे टोळीतील अल्पवयीन संशयितांनी पोलिसांना सांगितले.