एटीएम कार्ड बदलत सोन्याची अंगठी खरेदी; चोरटा जाळ्यात

वयोवृद्धाच्या एटीएम कार्डची आदलाबदली करुन सोन्याची अंगठी खरेदी करणार्‍या चोरट्यास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्याच्या ताब्यातून सोन्याची अंगठी जप्त केली. पोलीस तपासात चोरटा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वीरभद्र कौशल (वय 41, रा .जेलरोड, नाशिक) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

देवळाली कॅम्पमध्ये वयोवृद्ध एटीएम सेंटरमध्ये पैसे काढत असताना एकाने हातचलाखीने एटीएमची आदलाबदल केली होती. वयोवृद्धाच्या एटीएममधून अनोळखी व्यक्तीने ५४ हजार रुपये काढले होते. शिवाय, एका ज्वेलर्स दुकानातून एटीएम स्वॅप करुन सोन्याची अंगठी खरेदी केली होती. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ज्वेलर्स दुकानातून सीसीटीव्ही फुटेज मिळवले होते. त्याआधारे पथकाने तपास सुरु केला. पथकाने आरोपीचा शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने पुढील कारवाईसाठी त्यास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.