‘कांद्याला हमीभाव द्या’ म्हणत, महाविकास आघाडीचा रास्तारोको

नांदगाव : कांदा पिकास हमीभाव मिळावा, शेतकर्‍यांना पीकविम्याचे पैसे मिळावे, नांदगाव तालुक्याचा नार – पारच्या डीपीआरमध्ये समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि. २७) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोर महाविकास आघाडीतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार अनिल आहेर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार संजय पवार, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दोन तासांपेक्षा जास्त वेळ रास्तारोको आंदोलन केले.

राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे, कांद्याला हमीभाव दिलाच पाहिजे, केंद्र व राज्य सरकार हाय हाय… अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी माजी आमदार आहेर, देशमुख, धात्रक, भुजबळ, पवार यांनी आपल्या भाषणातून राज्य व केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रास्तारोको आंदोलनामुळे नांदगाव – येवला महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी महाआघाडीच्या वतीने नायब तहसिलदार केतन कोनकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडीचे शिवसेना शहरप्रमुख श्रावण आढाव, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज चोपडे, राष्ट्रावादी शहराध्यक्ष अरूण पाटील, संतोष बळीद, प्रसाद पाटील, विनोद शेलार, दीपक खैरनार, संजय सोमासे, डॉ. भरत जाधव, फैज शेख, बाळासाहेब देहाडराय, दीपक गोगड, आनंद बोथरा, प्रतिक कोरडे, महेश पवार, शंकर शिंदे, अशोक चोळके, सूरज पाटील, अशोक पाटील, जहिर सौदागर, दत्तू पवार, राजू लाठे, मुज्जू शेख, योगिता पाटील, सिमा राजोळे, हबीब शेख, उदय पवार, प्रताप गरूड यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.