केतकी चितळेंविरुद्ध नाशकात गुन्हा दाखल, निखीलला पोलीस कोठडी

शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरण

Actress Ketki Chitale will be arrested for controversial statement?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी फिर्याद दिली आहे. न्यायालयाने सोशल मीडियावर शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या निखील भामरे (रा.पिंगळवाडे, ता. बागलाण) याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नाशिक सायबर पोलिसांत चितळेविरुद्ध शांतता भंग आणि अपमानकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सविस्तर अहवाल सहायक पोलीस आयुक्तांमार्फत आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर चितळेच्या अटकेची कारवाई होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भामरेविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भामरे हा दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथील एका फार्मसी महाविद्यालयात पदवीच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहे. या गुन्ह्यामुळे त्याच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्याचे सोशल मीडियावरचे खाते तात्पुरते निष्क्रिय करण्यात आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी भामरे याला शनिवारी सायंकाळी म्हसरुळ बाजारपेठेतून अटक केली. त्याला रविवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी भामरेच्या चौकशी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितले. त्यानुसार न्यायालयाने भामरेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठाणे पोलिसांनी मागितला भामरेचा ताबा

शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे आणि पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानुसार ठाणे पोलिसांनी निखील भामरेचा ताबा मिळण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, नाशिक ग्रामीण पोलिसांकडून भामरेची चौकशीची झालेली नाही. भामरेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस ठाणे पोलिसांना भामरेचा ताबा देणार आहेत.