घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनामको हॉस्पिटलमध्ये पाऊणे चार कोटींची कॅथलॅब, विश्वस्तांचा सर्वांनुमते निर्णय

नामको हॉस्पिटलमध्ये पाऊणे चार कोटींची कॅथलॅब, विश्वस्तांचा सर्वांनुमते निर्णय

Subscribe

जागतिक ह्नदयदिनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेचा निर्णय, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार दिलासा

कॅन्सरसह इतर सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या नामको हॉस्पिटलने जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधत जगातील सर्वोत्तम कॅथलॅब खरेदीचा निर्णय घेत आरोग्य सेवेचा आणखी एक टप्पा पार केला आहे. ही कॅथलॅब तब्बल पाऊणेचार कोटी रुपयांची असून, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांवर अत्यंत अचूकपणे उपचार शक्य होणार आहेत.

सर्वोत्तम तंत्रज्ञान, सर्वोत्तम तंत्रज्ञ आणि निष्णात वैदयकीय तज्ज्ञ ध्येय असलेल्या नामको रुग्णालयाने वैद्यकीय सेवेच्या कक्षा रुंदावण्याकडे लक्ष केंद्रीय केले आहे. त्याचाच भाग म्हणून नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सेक्रेटरी शशिकांत पारख, अरुणकुमार मुनोत, खजिनदार अशोक साखला यांच्यासह विश्वस्त सुरेश पाटील, चंद्रकांत पारख, ललित मोदी यांनी विविध कंपन्यांशी चर्चा केली. त्यानंतर जागतिक आघाडीवर असलेल्या फिलिप्स कंपनीचे मॉडेल खरेदी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी जागतिक हृदयदिनी सेक्रेटरी पारख यांनी फिलिप्स कंपनीचे पश्चिम भारताचे विक्री प्रमुख ब्रिजेश सिंग यांना पर्चेस ऑर्डरची प्रत दिल्यानंतर खरेदीवर शिक्कामोर्तब झाले. नुसार जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान असलेल्या फिलिप्स कंपनीची अॅझुरिऑन-3, एम.12 ही कॅथलॅब खरेदी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. ही कॅथ लॅब रूग्णांसाठी वरदान ठरणार आहे.

- Advertisement -

गरिबांना परवडणारे आणि श्रीमंतांना आवडणारे’ हे ब्रीद घेऊन अखंड रुग्णसेवा देत असलेल्या नामको हॉस्पिटलमधील सेवांचा लाभ उत्तर महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमधील रुग्णदेखील घेत आहेत. समाजातील या गोरगरीब रूग्णांनादेखील ह्नदयरोगावर ‘कॉर्पोरेट’ दर्जाचे उपचार मिळावेत, या हेतुने नामको हॉस्पिटल व्यवस्थापन व विश्वस्त मंडळाने हे तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला.

हे उपचार होतील शक्य

उत्तर महाराष्ट्रासह धर्मादाय रूग्णालयातील ही पहिलीच अत्याधुनिक कॅथलॅब यंत्रणा आणि तंत्रज्ञान आहे. याद्वारे ह्नदयरोगाच्या रूग्णांची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसह ह्नदयाचे व्हॉल्ह बदलणे असे विविध उपचार शक्य होतील. कमीत कमी किरणोत्सर्जन (रेडीएशन), अतिसूक्ष्म व हायडेफिनेशन इमेजिंग यामुळे उपचारांत अधिकाधिक अचूकता येते. अॅझुरिऑन हे कॅथलॅबमध्ये वापरण्यात येणारे सर्वात प्रभावी व उत्तम गुणवत्ता असलेले तंत्रज्ञान समजले जाते.

एखादे धर्मादाय रुग्णालय किती उच्च दर्जाचे उपचार सुविधा देऊ शकते, याचे उदाहरण आम्ही नामको हॉस्पिटलच्या माध्यमातून उभे केले आहे. संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्यासमवेत विश्वस्तांनी अत्यंत विचारपूर्वक कॅथलॅबचा निर्णय घेतला. रूग्णांना एक रूपयाही अधिक न देता याचा लाभ घेता येईल. विविध सरकारी योजनांतर्गत अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत उपलब्ध होईल. विशेष म्हणजे शहरातील तज्ज्ञ या ठिकाणी येऊन उपचार करू शकतील. – शशिकांत पारख, सेक्रेटरी, नामको ट्रस्ट

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -