नाशिकच्या लाचखोरीवर आता सीबीआयची नजर

केंद्र सरकार, बँक, रेल्वे किंवा केंद्रिय संस्थेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास तक्रारदारास तक्रार करता येणार

नाशिक : लाचखोरी रोखण्यासाठी सीबीआयचे पथक नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकाकडून केंद्रिय सरकारचे अधिकारी, कर्मचारी आणि केंद्रीय संस्थांमधील भ्रष्ट व्यक्तींवर कधीही छापे टाकले जाणार आहेत. त्यामुळे केंद्रीय
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक
विभाग, मुंबईचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने शुक्रवारी (दि. २९) सकाळी ११.३० वाजता प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

केंद्रीय कर्मचाऱ्यांतर्फे लाचेची मागणी केली जात असावी. आता त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. यासाठी शहानिशा करुन सापळा रचणे, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी सीबीआयने नियोजन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातभ्रष्टाचारविरुद्ध लढाईत प्रबोधन सुरु केले आहे. केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीविरुद्ध तक्रार दाखल करुन कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सीबीआयच्या एसीबीचे पोलीसनिरीक्षक रंजीतकुमार पाण्डेय, गजानन देशमुख आणि जे. प्रेमकुमार यांच्यासह नाशिक एसीबीचे अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे आणि पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार उपस्थित होते.

 

सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुंबई परिक्षेत्रात सर्व ठिकाणी प्रबोधन केले जात आहे. ४ आणि ५ मे रोजी नाशिकच्या सातपूर येथील स्टेट बँक इंडियाच्या मुख्य शाखेत पथक नागरिकांशी संवाद साधणार आहे. या ठिकाणी नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करता येणार आहेत. पथक दर महिन्यात ठराविक दिवशी नाशिकमध्ये असणार आहे.
– रंजीतकुमार पांडेय,  निरीक्षक, सीबीआय

 

तक्रार कशी करावी

केंद्र सरकार, बँक, रेल्वे किंवा केंद्रिय संस्थेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास तक्रारदारास तक्रार करता येणार आहे. तक्रादारांना ०२२-२६५४३७०० या क्रमांकावर अथवा ८४३३७००००० या व्हॉटसअॅप क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. तसेच [email protected] या ईमेल आयडी किंवा www.cbi.gov.in या वेबसाइटवरही तक्रार नोंदवता येणार आहे.