सप्तशृंग गडावर सीसीटीव्हीची; १०८ कुंडही करणार पुनर्जिवित

जिल्हा परिषद अध्यक्षांची माहिती; ग्रामविकास विभागातर्फे 20 कोटी रुपयांचा निधी

Vani-2014-24
सप्तशृंग गडावर आता सीसीटीव्हीची नजर

साडेतीन शक्तीपिठांमधील एक असलेले श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर येणार्‍या भाविकांच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच डोम व कमान उभारण्यात येणार असून, येथील 108 कुंड पुनर्जिवित करण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा आराखडा तयार केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी दिली.

सप्तशृंग गडास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. तीर्थक्षेत्रांतर्गत मुलभूत कामांसाठी जिल्हास्तरीय समितीने आराखडा तयार केला असून तो शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. ऑक्टोंबर २०१८ मध्ये उच्चाधिकार समितीच्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनी सांडपाणी प्रकल्प, शौचालय, दिंडोरीच्या पायर्‍या (शेडसहित) या तीन कामांचा प्राधान्याने समावेश करणे आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी निधीची तरतूद करणे, मोकळ्या परिसरात वृक्षारोपण करणे, वन विभागाच्या जमिनीबाबत वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन सुधारित आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पगार, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी चर्चा करून मूळ आराखड्यात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० कोटी २२ लाख रुपयांचा सुधारित आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादा भुसे यांच्यामार्फत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगळे यांनी सांगितले.

ही होतील कामे

या आराखडयात सांडपाणी प्रकल्प, मोकळ्या परिसरात वृक्षारोपन, सीसीटीव्ही बसवणे, डोम व कमान बांधणे, साईड गटारींसह रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शाळेजवळ सरंक्षण भिंत बांधणे, २ शौचालय युनिट, वणी- चंडीकापूरच्या बाजूने गडावरील पायर्‍यांची दुरुस्ती करणे, वणी- चंडीकापूर रस्त्याची दुरुस्ती, अंतर्गत पाणीपुरवठा लोखंडी पाईपलाईन करणे, भवानी पाझर तलाव ते जलशुद्धीकरण पाईपलाईन दुरुस्ती, १०८ कुंड पुनर्जिवीत करणे, वीजपुरवठा लाईन भूमिगत करणे, वणी ते गडापर्यत जाणार्‍या रस्त्यांवर स्ट्रिटलाईट बसवणे, सप्तश्रृंगी गड ते फॉरेस्ट नाका कमान तयार करणे, वन जमिनीवर नक्षत्र बगीचा तयार करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.