घर उत्तर महाराष्ट्र चाहूल गणेशोत्सवाची : पुन्हा पारंपरिक देखाव्यांचा ट्रेंड, मंडळे धार्मिक देखावे साकारणार

चाहूल गणेशोत्सवाची : पुन्हा पारंपरिक देखाव्यांचा ट्रेंड, मंडळे धार्मिक देखावे साकारणार

Subscribe

स्वप्निल येवले । नाशिक 

श्री गणेश चतुर्थीला अर्थात भाद्रपद शु. ४ (दि.१९) आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, शहर आणि जिल्ह्याच्या चालीरीती व परंपरा या वेगवेगळ्या असल्याने प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भक्तीभाव मात्र सर्वांमध्ये सारखाच असतो. महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि नाशिकसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पुणे व मुंबईत उंच व आकर्षक विविध धातूंचे व आभूषणांनी सजलेल्या गणेशमूर्तींचे देखावे असतात तर, नाशिक शहरात चलचित्राद्वारे सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन करणारे देखावे मोठ्या प्रमाणात उभारले जातात. म्हणूनच यंदा धार्मिक देखाव्यांचीच क्रेझ दिसते आहे.

- Advertisement -

यंदा जिल्ह्यासह शहरात सार्वजनिक मंडळांनी मोठ्या प्रमाणात धार्मिक देखावे उभारणीवर भर दिला आहे. या देखाव्यांमध्येदेखील शिवशंकराचे आणि शिवलिंगाच्या देखाव्यांची संख्या अधिक आहे. प्रत्येक लहान-मोठे सार्वजनिक मंडळ आपापल्या परीने देखावा उभारून गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात समाजप्रबोधन, धार्मिक, लोकसंगीत, जनजागृती यांसारख्या विषयांवर मंडळे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करत आहेत. भाविकांनी आपले देखावे पाहण्यासाठी आकर्षित होऊन गर्दी करावी यासाठी कार्यकर्ते तहानभूक विसरुन एक ते दीड महिन्यांपासून गणेशोत्सवाच्या तयारीत गर्क आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेकांच्या हातांना रोजगार मिळतो. मंडप बांधणार्‍यांपासून ते मंडपाची सजावट व देखावे तयार करणारे मूर्तीकार तसेच, गणपती विक्रेते, मूर्तीला लागणारे रोजचे हार-फुले विक्रेते, लहान-लहान फेरीवाले, रस्त्यावरील फुगे व खेळणी विक्रेते या सर्वांचे मोठ्या प्रमाणात अर्थचक्र गणेशोत्सवात फिरत असते. न्यायालयाच्या आदेशामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर निर्बंध आल्याने भव्यदिव्य देखाव्यांच्या मूर्ती साकारताना मूर्तीकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे फायबर किंवा इतर साहित्यापासून मूर्ती बनवल्यास त्याचा खर्च वाढत असल्याने सार्वजनिक मंडळे तितकी रक्कम देत नाहीत. आजकाल सार्वजनिक मंडळे असे भव्यदिव्य देखावे भाड्याने घेत असले तरी त्या मूर्त्या बनविण्यासाठी केलेला खर्च चार-पाच वर्षे मूर्त्या भाड्याने देऊनही वसूल होत नाही. त्यात मंडळांना देखावे भाड्याने दिल्यास ते वाहतूक करताना होणारी तुटफूटदेखील मोठी असते. त्यामुळे गणेशोत्सव संपल्यावर लगेच आलेले देखावे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागत असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.

- Advertisement -

देखाव्यासाठी उभारण्यात येणार्‍या विषयानुरूप लहान मोठ्या व्यक्तिरेखा मूर्तीच्या माध्यमातून साकारणे हे सोपे काम नाही. त्यासाठी लागणारे कारागीर, सुतार, पेंटर, मजूर असे सर्व कामगार एकत्र घेऊन मूर्तिकार आपला कारखाना चालवत असतो. परंतु, गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यावर सरकारकडून जे निर्बंध घालण्यात आलेले आहेत ते यंदाच्या गणेशोत्सवासाठीदेखील लागू असल्याने मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शहरात आजघडीला ८ ते १० लहान-मोठे गणेशोत्सवातील देखावे तयार करणारे मूर्तीकार असून, त्यांच्या माध्यमातून साधारण ४० ते ५० लाखांची उलाढाल होऊन ३५० ते ४०० कामगारांना रोजगार मिळत होता. देखाव्यासाठी लागणार्‍या मूर्त्या ८ ते १० दिवसांत तयार करणे शक्य नसल्याने सलग वर्षभर मूर्त्या बनवण्याचे सुरू असते. दरवर्षी गणपती मंडळांकडून विषयानुसार होणार्‍या देखाव्यांची चौकशी लक्षात घेऊन देखावे बनवले जातात. गणेशोत्सवातील निर्बंधांमुळे अनेक मूर्तीकारांनी देखावे बनविण्याचे काम केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न ठेवता त्याला व्यावसायिक स्वरूप दिले आहे. कामगारांची रोजंदारी वाढलेली असल्याने त्यांना गणेशोत्सवाच्या कामासाठी सांभाळणे मूर्तीकारांना शक्य होत नाही.

राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या शिवपुराण कथा तसेच, टीव्ही मालिकांमुळे धार्मिक चलचित्र व भगवान शंकरांच्या देखाव्याला सार्वजनिक मंडळांची अधिक मागणी आहे. त्यामुळे यावर्षी सर्व देखावे गेल्या महिन्यात बूक झाले असून, आता त्यावर अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. : सुरेश भोईर, मूर्तीकार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे यंदाचे देखावे

  • पृथ्वी प्रदक्षिणेचा देखावा
  • तारकेश्वराचा वध
  • भगवान शंकरांच्या ४ ते ११ फूट उंचीच्या मूर्त्या
  • ज्ञानेश्वर व भिंत
  • पंढरीची वारी
  • कृष्णाचा माखनचोर देखावा
- Advertisment -