चांदवडला एक्स बँड रडारची गरज

हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी साधला पंतप्रधानांशी संपर्क

जागतिक तापमान, हवामान बदलाच्या योग्य नोंदी

नाशिक जिल्हयातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून चांदवडला एक्स बँड रडारची गरज आहे. एक्स बँड रडारसाठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला आहे. डॉप्लर रडारच्या सहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. २५० किलोमीटरपर्यंतच्या परिघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कोठे कोठे होणार, हे किमान एक तास आधी १०० टक्के अचूक सांगता येणार आहे.

डॉप्लर रडार ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. अचूक हवामान माहिती देण्यासाठी तिचा वापर जगभर सर्रासपणे केला जातो. डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडते. ढगांकडून परतणार्‍या लहरी ढगाची ’एक्स रे’प्रमाणे अद्यावत माहिती आणतात. डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते. परतीचा पाऊस आता सुरू होईल. डॉप्लर रडार यंत्रणेने तो कोठे आणि किती होईल याची माहिती मिळाल्यास प्रशासनाला मिळाल्यास आपत्कालीन अलर्ट देणे शक्य होईल आणि जीवित; तसेच वित्तहानी टाळणे खात्रीने शक्य होणार आहे.
डॉप्लर रडारची उभारणी महत्त्वपूर्ण मानण्यात येते. समुद्र किनार्‍यांवर, पर्वतीय परिसरातील संभाव्य पाऊस, चक्री वादळे, हिमवृष्टी, उष्म्याची लाट, हवामानातील अचानक बदल, ढगफुटीमुळे अतिवृष्टी, बर्फवृष्टी, धुलीकणांचे वादळ किंवा इतर वादळे होणार असतील, तर त्याचा अंदाज आधीच येऊ शकतो. त्या शहर, गाव, खेड्यातील हवामान खाते आपत्ती व्यवस्थापनास याची पूर्वकल्पना देऊन, संबंधित शहर अथवा गावात येणार्‍या प्रलयंकारी पाऊस, वादळ, पुरापासून मनुष्य आणि वित्त हानी टाळू शकते किंवा आधीच उपाय योजना केल्याने नुकसानाचे प्रमाण कमीत कमी करता येऊ शकते.
डॉप्लर रडार पावसाचे अचूक व खात्रीशीर पूर्वानुमान जाणून घेण्याचे उत्तम तंत्र समजले जाते. विद्युतचुंबकीय लहरींचा, मोकळ्या आकाशातील हवेच्या बदलांची अचूक माहिती (१ ते २ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), जवळच्या व दूरच्या ढगांच्या अचूक माहिती (२ ते ४ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), परदेशात खासगी टीव्ही वाहिन्या अति जवळच्या ढगांच्या अचूक माहितीसाठी (४ ते ८ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), हवेतल्या बाष्प, बर्फ कण तसेच पाण्याच्या थेंबांच्या आकार व प्रकार अचूक, तसेच ढगफुटींची माहिती (८ ते १२ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), ढग तयार होण्यासारखी परीस्थिती आहे का, बनलेला ढग गडद होईल की विखरून जाईल, वारे किती उंचीवर कसे वाहतात हे ८ ते १२ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीवर कळते. ढगातील एकूण बर्फ कण, पाणी आणि गारांच्या निर्मितीचा वेग व त्यावरून त्या किती नुकसान करू शकतात, याची अगदी प्रत्येक सेंटिमीटरच्या भागातली शंभर टक्के (१२ ते १८ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी) अचूक माहिती मिळते. हवेतील बाष्पाचे प्रमाण मोजण्यास १८ ते २४ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो.