घर महाराष्ट्र नाशिक भुजबळांच्या नकारानंतर नाशकात ऐन थंडीत राजकीय उष्मा

भुजबळांच्या नकारानंतर नाशकात ऐन थंडीत राजकीय उष्मा

Subscribe

नाशिकमध्ये छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भुजबळांच्या जागी कुणाला उमेदवारी द्यावी? याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यंदा लढाईपूर्वीच लोकसभेच्या मैदानातून काढता पाय घेतला आहे. यामुळे आता या जागेवर उमेदवारीसाठी नव्या चेहर्‍याचा शोध सुरु झाला आहे. हा चेहरा राष्ट्रवादीच्या दृष्टीने नवा असला तरीही राजकीय पटलावर त्याचा दबदबा असेल याच निकषातून चाचपणी सुरु आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील लोकसभेसाठी तयारी सुरु केल्याने छगन भुजबळ यांचा कौल नक्की कोणाला मिळतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नाशिकमध्ये सध्या तापमानाचा पारा कमालीचा घसरला असला तरी ऐन थंडीत राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता लागण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने आता पुढील तीन महिने राजकीय उलथापालथींना वेग आलेला असेल.

अन्य पक्षांना यंदा धुमारे

गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ‘पार्टी विथ डिफरंट’ म्हणवणार्‍या आणि मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये एकही ठोस प्रकल्प या कार्यकाळात उभा राहू शकला नाही, अशी नाशिककरांची भावना आहे. त्यातच तीन राज्यांत भाजपचे जे पानीपत झाले, त्यामुळे विरोधकांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे अन्य पक्षांना यंदा धुमारे फुटले आहे. छगन भुजबळ यांच्या पुनरागमनाने पक्षाला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होत असून त्यांनी देखील निवडणुकीसाठी स्वत:ला पूर्णत: झोकून दिल्याचे चित्र आहे. गेल्यावेळी शिवसेना-भाजपची वाढलेली ताकद बघता युतीच्या उमेदवाराला तुल्यबळ चेहरा असायला हवा म्हणून समीर यांना उमेदवारी न देता छगन भुजबळ यांना पुढे केले होते. परंतु हा प्रयोग युतीने यशस्वी होऊ दिला नाही. परिणामत: भुजबळ यांना हेमंत गोडसे यांनी पराभूत केले.

ही आहेत चर्चेतील नावे

- Advertisement -

माजी खासदार समीर भुजबळ हे देखील चाचपणी करीत आहे. याशिवाय माजी खासदार देविदास पिंगळे, निवृत्ती अरिंगळे, राष्ट्रवादी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, जिल्हा बँकेचे संचालक संदीप गुळवे, रयत शिक्षण संस्थेचे भगीरथ शिंदे, यांनी पक्षाकडे इच्छा प्रदर्शित केली आहे. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे माजी आमदार जयवंत जाधव यांचेही नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहे.


हेही वाचा – कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार

अन्य पक्षातील नेतेही रेसमध्ये

एकीकडे पक्षातून इच्छूकांची भाऊगर्दी असतांना दुसरीकडे अन्य पक्षातील नेतेही राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत. यात सध्या काही बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेना आणि भाजपमधून तिकीट न मिळाल्यास राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायची असाही काहींचा कयास आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -