खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

संत कबीर नगरातील दुर्घटना, पाण्याने भरलेल्या खड्डे बनले मृत्यूचे सापळे

akshay sathye
खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

संत कबीरनगर येथील महापालिका शाळेतून घराकडे परतणार्‍या अक्षय साठे (वय ७) या बालकाचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी, ३१ जुलैला घडली. या घटनेमुळे रस्त्यालगतचे खड्डे आणि लहानग्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संत कबीरनगर येथे राहणारा अक्षय हा बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान घराकडे परतत असताना ही दुर्घटना घडली. या रस्त्यावर एका इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी खड्डा खोदलेला आहे. हा खड्डा पाण्याने भरलेला होता. साडेनऊ वाजेच्या सुमारास घराकडे परतताना अक्षय या खड्ड्यात पडून बुडाला. कुटुंबाने शोधाशोध केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थी सुरक्षा ऐरणीवर

मराठा हायस्कूलमध्ये लोखंडी कपाट पडून विद्यार्थी ठार झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी ही घटना घडल्याने विद्यार्थी सुरक्षा ऐरणीवर आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे रस्त्यालगतच्या नवनिर्माणाधीन इमारती उभारताना बांधकाम व्यावसायिकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्यास महापालिकेने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली.