घरमहाराष्ट्रनाशिकबालपण हरवतंय पाण्याच्या शोधात

बालपण हरवतंय पाण्याच्या शोधात

Subscribe

अस्वस्थ शिवार : पिण्याच्या पाण्यासह, जनावरांसाठीही दिवसभर वणवण- दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या सुट्याही ‘पाण्यात’

साईप्रसाद पाटील

नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असताना महिला-पुरुषांसह चिमुकल्यांनादेखील पाण्यासाठी भर उन्हात वणवण फिरावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. हंडाभर पाण्यासाठी घरच्यांसोबत, किंवा अनेक ठिकाणी तर एकट्यानेच पाण्याच्या शोधात फिरणार्‍या या बालकांची स्थिती पाहून मन हेलावते. शहरी भागात अनेक जण सुट्यांत मामांच्या गावाला किंवा अन्यत्र फिरायला जातात, मौजमजा करतात, परंतु दुष्काळग्रस्त भागातील या चिमुरड्यांच्या सुट्याही ‘पाण्यात’च जात असल्याची शोकांतिका आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील चांदवड, नांदगाव, सिन्नर, त्र्यंबक, हरसूल, पेठ, मनमाड, निफाडसह अनेक तालुक्यांत भीषण पाणीटंचाई आहे. तब्बल पंधरा ते वीस दिवसांनी पाणी, दोन-तीन दिवसांनी एखादा टँकर येतो. हातपंपावर तर दिवसाला चार ते पाच हंडे भरतात, त्यातही दोन हंडे गढूळ पाणी… अशा स्थितीत गावातच न थांबता दूरवर पाण्याच्या शोधात अनेक मंडळी निघते. त्यात कर्त्या पुरुषासह घरातील लहान-थोर सर्वांचीच पायपीट सुरू होते. सध्या सुट्या असल्याने शालेय विद्यार्थ्यांचाही हाच नित्यक्रम. काही जण सायकलवर, तर काही पायी. गावाबाहेरील विहिरी, धरणांजवळील पाणवठे येथे पाण्याच्या शोधात ही चिमुकली पावले स्थिरावतात. हा झाला पिण्याच्या पाण्याचा संघर्ष. यानंतरही अनेकांना आपले पशुधन सांभाळण्यासाठी अतिरिक्त संघर्ष करावा लागतो तो वेगळाच. कुणी सायकलवर मिळेल तेथून ड्रमभर पाणी आणतो, तर कुणी आपली जनावरे घेऊन माळरानात वणवण फिरतो. भर उन्हात जनावरांना पाणवठ्यांवर घेऊन जाण्याची जबाबदारीही अनेक विद्यार्थ्यांच्या खांद्यावर असल्याचे विदारक चित्र आहे. ना अंगावर पूर्ण कापडं, ना डोक्यावर टोपी, ना पायात चप्पल, अशात त्यांच्या स्वास्थ्यावरही गंभीर परिणाम जाणवत आहेत. अगोदरच दूषित पाण्यामुळे आजारांना आमंत्रण मिळत असताना भर उन्हात ही रोजची पायपीट जीवघेणी ठरत आहे.

आरोग्याचा प्रश्न गंभीर

चिमुकल्यांना पाण्यासाठी तीव्र उन्हात फिरावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावरही याचा गंभीर परिणाम जाणवतो. अनेक ठिकाणी अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने घरातील थोरांसह लहानग्यांनाही अनेक आजारांनी घेरले असल्याचे चित्र दिसून येते.

- Advertisement -

स्नायू, मणके, कंबरदुखी

चिमुकल्यांना मोठमोठे हंडे, ड्रम घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यास त्यांना स्नायू, मणक्याचे विकार जडू शकतात. त्यांच्या हाडांची पूर्णत: वाढ झालेली नसल्याने त्यांना कंबरदुखी, तसेच माणेचे, मणक्याचा त्रास होतो. अनवाणी फिरणार्‍या मुलांना इजा होतात, सनस्ट्रोकही बसतात. त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. – डॉ. राहुल सावंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -