मुलांचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल करणे पडले महागात

दोन सख्या भावांवर पोस्कोचा गुन्हा दाखल

Crime photo
प्रातिनिधिक फोटो

अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राचे अश्लिल व्हिडीओ काढून ते सोशल मिडियावर व्हायरल केल्याचा प्रकार शरणपूर रोडच्या मिशन मळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी संबंधितांना जाब विचारला असता दोनजणांनी पीडित मुलासह त्याच्या वडील व भावास मारहाण केली. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन भावांवर पोस्को व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य अनिल वाघमारे, अजय अनिल वाघमारे (रा. मिशन मळा, शरणपूररोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आदित्य वाघमारे याने अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राचे जबरदस्तीने वेळोवेळी अश्लिल व्हिडीओ काढून ते परिसरातील मुलांच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केले. व्हिडीओमुळे त्या मुलांची परिसरात बदनामी होवू लागली. अनेक मुले पीडित मुलांना चिडवू लागली. याप्रकरणी पीडित मुलाच्या आई व वडिलांनी आदित्य वाघमारे यास जाब विचारला. राग अनावर झाल्याने आदित्यने भाऊ अजय यास बोलावून घेत पीडित मुलाच्या घरात घुसले. आदित्यने मुलाच्या वडिलांना दगड फेकून मारला. त्यात ते जखमी झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.

पोलिसांत तक्रार केली तर तुमच्या घरी येऊन मारु

वडिलांशी दोघेजण भांडण करत असल्याचे दिसताच पीडित मुलाचा मोठा भाऊ मध्यस्थी झाला. राग अनावर झाल्याने त्यास आदित्य वाघमारे याने मारहाण केली. पोलिसांत तक्रार केली तर तुमच्या घरी येऊन मारु, अशी धमकी आदित्यने त्यास दिली.