Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक आरोग्य समस्यांची दखल घ्या अन्यथा ‘ताला ठोको’ आंदोलन

आरोग्य समस्यांची दखल घ्या अन्यथा ‘ताला ठोको’ आंदोलन

जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेण्याची मागणी

Related Story

- Advertisement -

सर्वत्र कोरोनाची लढाई सुरू असताना सटाणा शहरात डेंगू, मलेरिया, चिकनगुनीया यासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असून घर तेथे साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत सटाणा पालिका प्रशासनाचे शहरवासीयांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

यामुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आरोग्याच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी येत्या आठ दिवसात तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर महाविकास आघाडीतर्फे पालिका कार्यालयाला कुलूप लावून ‘ताला ठोको’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सटाणा शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

- Advertisement -

याबाबत माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, भारत खैरनार, डॉ. व्ही.के. येवलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, रत्नाकर सोनवणे, किशोर कदम, यशवंत कात्रे, मोहन खैरनार आदींनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. मात्र यावर कोणत्याही उपाययोजना करण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरत आहे. खासगी जागेत औषध फवारणी केली जात नाही. शहरात सार्वजनिक स्वच्छतेचे बारा वाजले असून कचरा, पाण्याची डबकी, रस्त्याच्या कडेने वाढलेले गवत, तुंबलेल्या नाली, उघड्यावर वाहत्या गटारी हेच सगळ्या शहराचे चित्र झाले आहे. गेल्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले असताना या काळात पालिका प्रशासनाने शहरातील भीषण कोरोना परिस्थिती आणि नागरिकांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शहरातील बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यानुसार आताही आरोग्याच्या समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.

नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सत्तेत आल्यापासून जवळच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून पालिकेतील सर्व कामांचे टेंडर ठेकेदार कार्यकर्त्यांना वाटले जात आहेत. टक्केवारीबरोबरच स्वत:ही या कामांमध्ये भागीदारी करून पालिकेचा निधी लाटला. त्यामुळे शहरात आरोग्यविषयक कामेच होत नसल्याने आरोग्याच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणात अपहारही होत आहे. सटाणा ग्रामीण रुग्णालयात शहरातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडसह कोविड केअर सेंटर सुरू होऊ नये याकरिता नगराध्यक्ष सुनील मोरे अनेक प्रयत्न केले, ही वस्तुस्थिती आहे. या प्रकारावरून नगराध्यक्ष मोरे शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने किती संवेदनशील आहेत, हे समजते. पालिका प्रशासनाने डेंगी, मलेरिया, चिकनगुनीया यासारखे साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी येत्या आठ दिवसात तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर महाविकास आघाडीतर्फे पालिका कार्यालयाला कुलूप लावून ‘ताला ठोको’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

- Advertisement -