घरमहाराष्ट्रनाशिकउद्यानात जप करताना ‘अवतरला’ बिबट्या

उद्यानात जप करताना ‘अवतरला’ बिबट्या

Subscribe

डॉ. हेमा काळे यांनी कथन केला थरार अनुभव; प्रत्यक्षदर्शींची आखोदेखी खास ‘आपलं महानगर’च्या वाचकांसाठी

सूर्योदयानंतर उद्यानाच्या बाकावर ओमकाराचा जप करत होते.. मागून गुरगुरण्याचा आवाज आला… काही समजण्याच्या आत माझ्या डोक्यावरुन झेप घेत बिबट्या पुढे पळून गेला… शारदा नगर येथील डॉ. हेमा विजय काळे यांचा हा शुक्रवार २५ जानेवारीचा अनुभव. शुक्रवारी ‘बिबट्यानाट्य’ सुरु झाले ते येथील उद्यानातून..

dr hema kale
डॉ. हेमा काळे

महापालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. हेमा काळे या सावरकरनगर परिसरातील शारदा नगरमध्ये राहतात. बिबट्याचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, मी रोज सकाळी शारदा नगर उद्यानात ओमकाराचा जप करते. आज सकाळी ७.३० च्या सुमारास जप करत असताना माझ्या मागे एक फूट अंतरावर झुडपांमागे बिबट्या उभा होता. त्याने डरकाळी फोडल्यावर सुरुवातील मी घाबरले, पण नंतर वाटले मोठे कुत्रे असेल. म्हणून मी त्याला ‘हाड हाड’ करुन हाकलण्याचाही प्रयत्न केला. काही क्षणातच माझ्या मागे उभ्या असलेल्या बिबट्याने माझ्या डोक्यावरुन पुढे झेप घेतली आणि उद्यानाचे कंपाऊंड उलांडूून तो पुढे पळून गेला. त्याचे रुप बघून माझी बोलतीच बंद झाली होती… हा अनुभव सांगतानाही शारदा ताईंना शहारा आला होता.

- Advertisement -

बिबट्याचा नव्हे राजकारणी अन् बघ्यांचा धुमाकूळ

गंगापूर रोड परिसरात सकाळी तीन तास बिबट्याची दहशत पसरली होती. यावेळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केल्याने बिबट्याला जेरबंद करण्यास अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे हिंस्त्र प्राण्याला पकडण्याचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतानाही काही लोकप्रतिनिधी चक्क हातात दंडूके घेत बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होते. काही महाभाग तर वनविभागातील कर्मचार्‍यांच्या हातून जाळी हिसकावत स्वत: ती बिबट्यावर टाकण्याचा प्रयत्नात होते. या अती उत्साही ‘महाभागां’मुळे वन विभागासह पोलिसांना आपली कामगीरी बजावण्यात अडथळा निर्माण होत होता. परिणामत: बिबट्याला पकडण्यास तब्बल तीन तासांचा अवधी गेला. त्यामुळे शुक्रवारी बिबट्याने नव्हे तर राजकारणी आणि बघ्यांनीच धुमाकूळ घातल्याचे स्पष्ट झाले

अधिकारी म्हणतात..

बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने बिबट्याला जेरबंद करणे जिकरीचे झाले होते. रहिवासी भाग असल्यामुळे त्याला पकडण्यात बर्‍याच अडचणी येत होत्या. अशा वेळी लोकांनी शांततेचा मार्ग स्वीकारत सहकार्य केले तर आम्हाला आमचे काम विनाअडथळा करता येईल. – रवींद्र भोगे, वनपरीक्षेत्र अधिकारी

- Advertisement -

वनविभाग, पोलीस आणि अग्नीशमन कर्मचारी वेळेत पोहचले होते. नागरिकांनीही समजदारीची भूमिका घेत अशा हिंस्त्र प्राण्यांपासून लांब उभे रहावे. कर्मचार्‍यांना काम करु देण्यास अडथळा निर्माण केल्यास त्यातून दुर्देवी घटनाही घडू शकते.
– रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त

जखमी म्हणतात…
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मी एका बंगल्याच्या पार्कींगमध्ये उभा होतो. अचानक बिबट्याने माझ्यावर झडप घातली. तरीही मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्या पळून गेला. – उत्तम पाटील, वनरक्षक

माझ्या प्रभागात बिबट्या शिरल्याचे मला सकाळी ७.३० ला समजले. ओपन प्लॉटमध्ये गवत वाढल्याने त्याला लपायला भरपूर जागा होती. सावरकरनगर येथील बंगल्यांच्या मोकळ्या जागेत बिबट्याने माझ्यावर झडप घालून खाली पाडले. त्यानंतर तो नागरिकांच्या दिशेने धावला. तितक्यात मी सावरून त्याच्यावर काठी भिरकावली. त्यामुळे तो शेजारच्या कंपाऊंडवर उडी मारून पळाला. – संतोष गायकवाड, नगरसेवक

मी व्हरांड्यात उभा असताना तेथे बिबट्या येईल, अशी कल्पनाही केली नव्हती. समोरून बिबट्याने हल्ला केला. त्याच्या तोंडावर मी थाप मारल्याने तो मला सोडून पळाला. – कपिल भास्क

मी वृत्तवाहिनीसाठी शुटींग करीत होतो. तितक्यात बिबट्या अंगावर आला. मी स्वत:ला वाचवण्यासाठी १५ फुट उंचीवरून खाली उडी मारली. त्यात माझे पाय जखमी झाले. तितक्यात मागून पोलीस काठ्या घेऊन आले. त्यामुळे मी थोडक्यात बचावलो. – तबरेज शेख

प्राणीप्रेमी म्हणतात.. 

सकाळी ८ च्या सुमारास रेस्कू टिम दाखल झाली. बघ्यांची गर्दी कमी असती तर अजून कमी वेळेत बिबट्याला पकडता आले असते. – अभिजित महाले

प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत बिबट्याजवळ गर्दी करणार्‍या नागरिकांवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बिबट्या दिसताच एक किलोमीटर अंतरापर्यंत कर्फ्यू लावणे गरजेचे असते. – ऋषिकेश नाझरे, प्राणी मित्र

प्रत्यक्षदर्शी म्हणतात..

बिबट्या प्रथमत: शारदा नगरला दिसला. त्यामुळे मी तातडीने पोलिसांसह वन विभागाला फोन करुन याविषयी माहिती दिली. माझ्यासमोर बिबट्या उद्यानाकडे गेला. – महेंद्र छोरीया

सकाळी १०.१० च्या सुमारास बिबट्याने आमच्या बंगल्यात उडी मारली. बंगल्याच्या खिडकीला दोन्ही पंजाच्या आधारे तो काही वेळ लटकला होता. ते बघून आमचे सर्वांचेच धाबे दणाणले. – आशा मारवा

आमच्या तथास्तु बंगल्यात बिबट्या सकाळी ९ च्या सुमारास घुसला. आम्ही आरडाओरड केल्याने तो बाहेर पळाला. पण दरम्यान, त्याने माझ्या मुलाला किरकोळ स्वरुपात जखमी केले. – शीतल पटेल

७.४५ च्या सुमारास आमच्या बंगल्यासमोर बिबट्या धावत गेला. मी आरडाओरड करून लगेचच परिसरातील रहिवाशांना याबाबत माहिती सांगितली. – प्रज्ञा आवारे

बिबट्यावर सर्वप्रथम मीच जाळी टाकली. तेव्हा त्याने पंजा मारुन माझे जाकीट फाडले. त्याची ताकद इतकी होती की पंधरा लोकांनी त्याला दाबून धरल्यावरही तो उसळी घेत होता. – नीलेश कडलग

बिबट्याला भूल देण्याचे इंजेक्शन दिल्यावर आता तो पकडला जाईल, असे वाटले होते. समोरच्या गच्चीवरुन त्याला जाळी टाकून पकडता येईल असे वाटल्याने आम्ही गच्चीवर उभे राहिलो. पण पत्रा फुटल्याने मी खाली पडलो. – डॉ. अनिकेत आहिरे

सकाळपासूनच आम्ही बिबट्याच्या मागावर होतो. आशीष किराणाजवळ तो सर्वप्रथम दिला. त्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी आम्ही पोलीसांना मदत केली. – नारायण जाधव

सकाळी ७,४५ च्या सुमारास शारदा नगरमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच मी प्रथमत: पोलिस आणि वनविभागातील अधिकार्‍यांना फोन लावला. त्यानंतर तातडीने संबंधित कर्मचारी दाखल झाले. – रमेश पाटील, माजी पोलीस निरीक्षक

– मारवा हाउस बंगल्यातील जगदीश मारवा हे वयोवृद्ध गृहस्थ सकाळी गॅलरीत आले, त्यावेळी पार्किंगमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. त्यामुळे त्यांनी तातडीने आतल्या खोलीकडे धाव घेतली.

– शंकरनगरमधून सावरकरनगरमध्ये बिबट्या शिरल्यावर तेथे वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी जाळी लावली; परंतु तो जाळीखालून पळून गेला

माजी आमदार निशिगंधा मोगल यांच्या बंगल्यात बिबट्याचा मुक्त संचार

नाशिक शहरातील सावरकर नगरमधे भाजपच्या माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल यांच्या बंगल्यात बिबट्याचा १० ते १५ मिनिटे मुक्त संचार होता. बिबट्याने बंगल्याच्या छोट्या गेटमधून प्रवेश केला व पार्किंग व इतर ठिकाणी फिरून वॉल कंपाउंड भिंतीवर ठाण मांडले. बंगल्यात राहणारे सुरक्षारक्षकाच्या पत्नीने सर्वप्रथम बिबट्याला बघितले. बिबट्या पाठमोरा असल्याने त्याने त्यांना व त्यांच्या ३ वर्षीय मुलाला बघितले नाही. त्यांनी लगेच आपल्या रूममध्ये मुलाला घेऊन पळ काढला व घरात असलेल्या पतीला बंगल्यात बिबट्या असल्याचे सांगितले. पतीने समृद्ध मोगल यांना फोन करून घटनेची माहिती दिली. समृद्ध मोगल यांनी नगरातच राहणारे भाजपाचे उपाध्यक्ष अनिल भालेराव यांना बिबट्याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाला माहिती कळविण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -