घरमहाराष्ट्रनाशिकबिहारराज; शहर पोलिसांनी केले २१ गावठी कट्टे जप्त

बिहारराज; शहर पोलिसांनी केले २१ गावठी कट्टे जप्त

Subscribe

शहरातील अवैध शस्त्रविक्री फोफावली; सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, पोलीस यंत्रणेपुढे आव्हान

पंचवटी पोलीस ठाण्यासह आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत गत वर्षभरात सुमारे २१ ‘वस्तू’(गावठी बनावटीचे कट्टे) जप्त करण्यात आले आहेत. या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गावठी बनावटीचे कट्टे सहज मिळून येत असल्याने गुंडगिरी तसेच गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. गावगुंडांकडून राजरोसपणे खंडणी, दहशत निर्माण करणे, लुटमारीच्या घटना घडत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षितेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गावठी बनावटीच्या बंदुका, रामपुरी चाकू, तलवारी, गुप्ती, चॉपर आदी हत्यारे अल्पदरात आणि विनापरवानगी उपलब्ध होत आहेत. ही अवैध शस्त्रे बिहार आणि उत्तर प्रदेशातील खेड्या-पाड्यांवरून मागवली जात असल्याचे बोलले जाते. बहुतांश गुन्हेगार कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी जातात, त्यावेळी परप्रांतीय गुन्हेगारांसोबत त्यांची ओळख होते. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. त्यातून परप्रांतीय गुन्हेगार प्राणघातक शस्त्र कारागृहाच्या बाहेर असलेल्या त्यांच्या परप्रांतीय गुन्हेगारांमार्फत मागवून देत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

- Advertisement -

अशाच प्रकारे आजघडीला शहरातील गुन्हेगारांकडून परराज्यांतील गावठी बनावटीच्या बंदुकांसह प्राणघातक हत्यारे आणली जात आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयातील पंचवटी, म्हसरुळ आणि आडगाव पोलीस ठाणे हद्दीत असे तब्बल 21 गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. यापैकी पंचवटी पोलिसांनी ९, म्हसरूळ पोलिसांनी 9 आणि आडगाव पोलिसांनी ३ अशा एकूण ‘वस्तू’ पकडल्या आहेत. पंचवटी, म्हसरूळ आणि आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झोपडपट्ट्या आहेत. याठिकाणीच बहुतांश गुन्हेगारांचे वास्तव्य आहे. या गुन्हेगारांचा शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन, रात्रगस्त, झोपडपट्टीतील गुन्हेगारांची तपासणी आदी कारवाई करूनदेखील मोठ्या प्रमाणात ही प्राणघातक हत्यारे उपयोगात आणली जात असल्याचे दिसून येते.

शहरातील गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलिसांनी अशाप्रकारच्या अवैध शस्त्रांची विक्री वा पुरवठा करणार्‍यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र वरवरची कारवाई करून मोठ्या गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचेच अनेक प्रकरणांवरून दिसून येते. परिणामी आजही अनेक गुंडांसह ‘भाई’, ‘दादां’कडे सहजपणे गावठी कट्टे, चॉपर, तलवारी वा अन्य शस्त्रे असल्याचे दिसून येते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -