सिटीबस चालक, वाहकास मारहाण; चौघांना अटक

चारचाकी वाहनाला धक्का लागल्याची कुरापत काढून महिलेसह चौघांनी सिटीलिंक बसचालक आणि वाहकाला मारहाण केल्याची घटना म्हसरुळ बोरगड परिसरात शनिवारी घडली. मारहाणीचा संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. शिवाय, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी संशयित चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी गोकूळ काकड यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गोकुळ काकड हे सिटीलिंक बसवर चालक म्हणून कार्यरत आहेत. ते बस (एमएच १५-जीव्ही ७८७०) घेऊन नाशिकरोडवरुन बोरगड येथील कांसारा माता चौकात आले. त्यावेळी बससमोर कार उभी असल्याने ती बाजूला घ्या, धक्का लागेल असे सांगितले. कारमधील संशयित आदित्य चौधरी, मयूर वाघ, रमेश जाधव, प्रशांत गांगुर्डे यांना राग अनावर झाला. त्यानंतर महिलेसह चौघांनी चालक काकड व वाहक अक्षय गवारे यांना मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघ करत आहेत.