Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र Impact शहराचा कोंडला श्वास : प्रभारी आयुक्तांचा दणका; महापालिकेच्या लेटलतिफ १४ अधिकार्‍यांचे...

Impact शहराचा कोंडला श्वास : प्रभारी आयुक्तांचा दणका; महापालिकेच्या लेटलतिफ १४ अधिकार्‍यांचे कापले वेतन

Subscribe

नाशिक : प्रभारी आयुक्त तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बैठकीला गैरहजर राहिलेले पालिका अधिकारी लेटलतिफ असल्याचे आढळून आल्यानंतर प्रभारी आयुक्तांनी या सर्व अधिकार्‍यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने शिस्तीचा बाणा आणि कामाचा आव आणणार्‍या महापालिका अधिकार्‍यांचे पितळ उघडे पडले आहे.

आपल्यावर लक्ष ठेवणारेच कुणी नाही, असा समज असल्याने गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेत प्रचंड अनागोंदी सुरू आहे. अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या या मनमानीला प्रभारी आयुक्त गमे यांच्या कठोर भूमिकेमुळे चांगलाच चाप लावला आहे. अधिकार्‍यांच्या कामचलाऊ धोरणाचे किस्से व त्यांच्याकडे प्रलंबित फाईल्सबाबतच्या तक्रारी थेट गमे यांच्याकडे पोहोचल्याने गेल्या आठवडाभरापासून त्यांनी स्वतः महापालिकेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करत अधिकार्‍यांवर अंकुश ठेवायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात गमे यांनी माय महानगर मधून प्रसिद्ध होत असलेल्या शहराचा कोंडला श्वास या मालिकेची दखल घेत सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत अतिक्रमणांबाबत ठोस भूमिका घेत कारवाईदरम्यान प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची तंबी दिली होती. तसेच, अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.

या बैठकीनंतर प्रभारी आयुक्त गमे यांनी सोमवारी (दि.१५) अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला उपायुक्त करुणा डहाळे उपस्थित नव्हत्या. याबाबत त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी आपण कार्यालयातच होतो, मात्र बैठकीचा निरोप मिळाला नसल्याचे कारण त्यांनी सांगितले. त्यामुळे गमे यांनी थेट पालिकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले होते. या फुटेजनुसार उपायुक्त डहाळे या ११ वाजून १३ मिनिटांनी कार्यालयात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे वेतन कापण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आता प्रलंबित फाईल्सचा निपटाराही वेगाने सुरू झाला आहे.

या अधिकार्‍यांवर झाली कारवाई

- Advertisement -

अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड, नगररचना सहायक संचालक कल्पेश पाटील, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्यासह वेगवेगळ्या विभागाच्या १४ अधिकार्‍यांवर एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई करण्यात आली आहे. यानिमित्ताने प्रशासकीय राजवटीत निर्ढावलेल्या अधिकार्‍यांची कार्यपद्धती आणि त्यांची मनमानीदेखील पुढे आली आहे.

थोडे इकडेही लक्ष द्या

मुख्यालयात अधिकार्‍यांची एवढी मनमानी असेल तर विभागीय कार्यालयांतील कामकाजाचा विचार न केलेला बरा. त्यामुळे आता प्रभारी आयुक्तांनी हजेरी लावून खासगी कामांना निघून जाणारे, कार्यालयाबाहेर तंबाखू चोळत उभे राहणारे, चहाच्या टपर्‍यांवर बसणारे, जेवणाच्या नावाने दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान गायब होणारे, फाईल्स घेऊन ठराविक लोकांच्या दिमतीला हजर राहणारे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवरही थेट कारवाईचा आसूड ओढण्याची गरज आहे. तसे झाले तरच प्रलंबित कामांना मुहूर्त मिळेल आणि कारवाईचा धाक असल्याने सर्वसामान्यांची कामे वेगाने होतील.

महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या सर्व बैठकांना मी हजर होते. दररोज सकाळी नऊ-साडेनऊ वाजेपासून मी कार्यालयात उपस्थित असते. मी माझे काम अत्यंत प्रामाणिकपणे करते आहे. त्याचाच परिणाम सध्या शहरभरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमांमधून दिसत आहे. आदेश देऊनही चालढकल करणार्‍या कर्मचार्‍यांवर थेट कारवाईचे पाऊल उचलले आहे. : करुणा डहाळे, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग, महापालिका

- Advertisment -