सिव्हिल सोनोग्राफी मशीन प्रकरण : तक्रारीचा चेंडू जाणार आरोग्य उपसंचालकांकडे

नाशिक : जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि.२३) सोनोग्राफी मशीनचा विनापरवानगी डेमो घेतल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मनसेचे शहर चिटणीस प्रणव मानकर हे मंगळवारी (दि.२८) आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत. तपासात गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यास दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा रुग्णालयासाठी तीन सोनोग्राफी, नऊ टुडी इको मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. डॉ. अशोक थोरात यांनी बुधवारी (दि.२२) जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन खरेदीसाठी टेंडरमध्ये सोनोग्राफी मशीन तपासणीसाठी पत्र दिले होते. त्यानुसार निविदा भरलेल्या सहा ठेकेदारांना जिल्हा रुग्णालयाने गुरुवारी (दि.२३) निमंत्रित केले होते. या ठेकेदारांकडून सोनोग्राफी आणि टुडी इको मशीनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार सोनोग्राफी व टुडी इको मशीनचा डेमो जरी द्यायचा असेल तरी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. मात्र, परवानगी मिळण्याआधीच डेमो घेण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मानकर यांनी पोलिसांसह आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. आहेर यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

सोनोग्राफी मशीनचा डेमो घेताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात व इतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी गर्भलिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले आहे. सोनोग्राफी मशीनचा डेमो गुरुवारी (दि.२३) घेण्यात आला. प्रत्यक्षात महापालिकेने शुक्रवारी (दि.२४) परवानगी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे. : प्रणव मानकर, शहर चिटणीस, मनसे, नाशिक शहर