घरताज्या घडामोडीसिव्हिलचे कोविड सेंटर सुरु; पण टेस्ट, टीव्ही सारं काही बंद

सिव्हिलचे कोविड सेंटर सुरु; पण टेस्ट, टीव्ही सारं काही बंद

Subscribe

नाशिकlकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जिल्हा रुग्णालयास कोट्यवधी रुपये निधी दिला असला तरी प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये सुविधांची चणचण दिसून येत आहे. ग्रामीण भागातून येणार्‍या रुग्णास कीटअभावी बाहेरुन तपासणी करुन घेण्यास सांगितले जात आहे. कोरोना सेंटरमध्ये रिचार्जअभावी टीव्ही बंद अवस्थेत आहे. गरम पाणी मिळत नसल्याने अनेक रुग्ण बाहेरुन पाणी आहेत. कोरोना सेंटरची लिफ्ट बंद पडत आहे. विशेष म्हणजे, मुदत संपलेली औषधे जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित कर्मचार्‍यालाच दिल्याचे उघडकीस आले आहे.

राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन, पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जिल्हा रुग्णालयास कोट्यवधी रुपयांचा निधीही दिला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील कुंभमेळा इमारतीत कोरोना सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये रुग्ण तणावमुक्त राहण्यासाठी टीव्ही बसविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे टीव्ही केबल रिचार्ज अभावी बंद अवस्थेत आहेत. रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे रुग्णांसह कर्मचारीच सांगतात. ग्रामीण भागातील कोरोना संशयित रुग्ण सोमवारी (दि.२१) जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आला असता त्यास कीट उपलब्ध नसल्याने बाहेर तपासणी करा असे सांगण्यात आले. कोरोना सेंटरमधील चौथ्या मजल्यावर ऑक्सिजनचा पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना स्वतंत्र सिलेंडरव्दारे ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. विशेष म्हणजे, जिल्हा रुग्णालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्याच्यावर कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, त्यास जुलै २०२० मध्ये मुदत संपलेली औषधे देण्यात आली. ही बाब कर्मचार्‍याच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या डोळ्यात धूळफेक?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांच्या जागी डॉ. रत्ना रावखंडे यांना आता ही जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यासह सिव्हिलमधील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी डॉ. रावखंडे यांनी उपलब्ध अधिकारी, डॉक्टर, परिचारिका यांच्या मदतीने जोमाने कामकाज सुरुवात केली आहे. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या अन्य अधिकार्‍यांकडून मात्र डॉ. रावखंडेच्याच डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा संशय येतो. ‘आपलं महानगर’ने डॉ. रावखंडेंची बाजू ऐकण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांनी जिल्हा रुग्णालयात सारं काही सुव्यवस्थित असल्याचे सांगितले. अधिकारी वर्ग तर डॉ. रावखंडेंसमोर रुग्णालयातील गैरसोयींची वस्तुस्थिती मांडत नसेल ना, अशीही शंका त्यांच्या वक्तव्यावरुन येते. डॉ. रावखंडेंनी सर्वसामान्यांच्या भूमिकेतून जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थेची तपासणी केल्यास हाती काही वेगळेच पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयात कोरोना सेंटरमधील रुग्णांना आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार आहार, गरम पाणी, दूध दिले जात आहे. कोरोना ओपीडी चालू आहे. कोरोना सेंटरमधील टीव्ही चालू आहे की नाही, त्याची माहिती घेऊन तत्काळ रिचार्ज केला जाईल.
– डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -