Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक सकाळी स्वच्छता मोहिम, दुपारी अधिकारी गायब; 'झेडपी'चा आंधळा कारभार

सकाळी स्वच्छता मोहिम, दुपारी अधिकारी गायब; ‘झेडपी’चा आंधळा कारभार

Subscribe

नाशिक : गोदावरीच्या प्रदुषणाची काळजी करणार्‍या जिल्हा परिषदेने मंगळवारी (दि.2 मे) लाखलगाव येथे गोदावरी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले खरे मात्र गोदेची स्वच्छता करण्याच्या नादात इकडे जिल्हा परिषदेत दुपारनंतर निम्म्यापेक्षा जास्त अधिकारी गायब असल्याने जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना काम पूर्ण केल्याशिवाय रिकाम्या हातानेच परतावे लागले. यामुळे मोहिमेच्या नादात जिल्हा परिषदेचे कामकाज फसल्याचे दिसुन आले.

जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे मंगळवारी (दि.2 मे) गोदावरी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. यासाठी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा फौजफाटा लाखलगाव येथे सकाळी 8.30 वाजता उपस्थित झाला. मात्र अनेकांनी याठिकाणी दुरुन डोंगरे साजरे करण्याची पध्दत अवलंबिली तर काहींनी केवळ घटनास्थळी भेट देत उपस्थिती दर्शविली. यामुळे स्वच्छता मोहिम कितपत यशस्वी झाली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

स्वच्छ भारत अभियानांतर्गत दस्तुरखुद्द विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हजेरी लावली. यावेळी विभागीय आयुक्तांनी नदी स्वच्छता हे एक दिवसाचे काम नसून या कामात सातत्य गरजेचे असल्याचे सांगितले. यामुळे आता चार दिवसांच्या स्वच्छता मोहिम आखणारी जिल्हा परिषद नदी स्वच्छतेच्या कामात वर्षभर सातत्य कसे राखणार, आणि वर्षभर पाणवेली कशा काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विभागीय आयुक्तांनी ग्रामीण भागातील गोदाकाठावरील सर्व गावांनी गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नियोजनपूर्वक काम करायला हवे, गोदेची स्वच्छता करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे स्पष्ट केले. मात्र या मोहिमेत प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांशिवायच केवळ गटविकास अधिकारी सारिका बारी, उपसरपंच आत्मारात दाते, ग्रामसेवक नरेंद्र शिरसाठ हेच उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेदरम्यान लाखलगावचा एकही स्थानिक नागरिक हजर नसल्याने जिल्हा परिषदेच्या नियोजनावरही यामुळे प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे. स्वच्छता मोहिमेसंदर्भात लाखलगाववासियांना विचारले असता त्यांनी जिल्हा परिषदेने विश्वासात घेतले नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेने स्वच्छता मोहिमेचा केवळ सोपस्कार पार पाडल्याची चर्चा लाखलगाववासियांमध्ये दिवसभर सुरु होती. पुढे मार्गदर्शन करताना विभागीय आयुकत राधाकृष्ण गमे यांनी ग्रामीण भागातील नदी काठावरील सर्व गावांनी सांडपाणी व घनकच-याच्या उपाययोजना कराव्यात, प्लॅस्टिकचे योग्य व्यवस्थापन करावे व गोदावरी नदी प्रदुषित होणार नाही यासाठी जनजागृती करावी अशा सुचना दिल्या या सुचनांचे पालन जिल्हा परिषद प्रशासन कशाप्रकारे पालन करते याकडे ग्रामीणवासियांचे लक्ष लागुन आहे.

डाव्या बाजूच्या पाणवेली कोण काढणार?
- Advertisement -

प्रत्यक्षात ज्याठिकाणी मोहिम राबविण्यता आली तेथे ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आलेले आहे. ड्रेनेजच्या पाण्यामुळे याठिकाणी पाणवेली झपाट्याने वाढताना दिसुन येतात. त्यामुळे पाणवेलींच्या मुळ प्रश्नाला हात न घालता स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली केवळ वरवर मलमपट्टी करण्यात जिल्हा परिषदेने धन्यता मानल्याचे दिसुन आले. स्वच्छता मोहिमेनंतर पाणवेली वाढणार नाहीत यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबत जिल्हा परिषदेने कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले नाही. मोहिमेदरम्यान केवळ नियोजित ठिकाणीच जेसीबीद्वारे पाणवेली, घाण, कचरा काढण्यात आला. मात्र नदीच्या उजव्या आणि डाव्या बाजुला लांबपर्यंत पसरलेल्या वेली कोण आणि कशा काढणार याबाबतदेखील जिल्हा परिषदेने काहीही स्पष्टीकारण दिले नाही.

- Advertisment -