कांदे-भुजबळ वादाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

जिल्हा प्रशासनातल्या अधिकार्‍यांना मुख्यमंत्रयांच्या वर्षा निवासस्थानी पाचारण

जिल्हा नियोजन समितीच्या असमान निधी वाटपावरुन पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातला वाद आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाय.भुजबळांविरोधात कांदेंनी हायकोर्टात धाव घेतलीय. याप्रकरणाची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी निधीसंदर्भातली कागदपत्रं सादर करण्याचे आदेश देत जिल्हा नियोजन विभागाच्या अधिकार्‍यांनाही त्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलंय.

त्यामुळे या अधिकार्‍यांचं धाबं चांगलंच दणाणलंय. आमदार कांदेंनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेत तक्रार केली होती. दरम्यान, कांदेंनी बैठकीला नव्हे तर मागील वर्षाच्या निधीचं इतिवृत्त मंजुरीला विरोध असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.