निफाडकरांना पुन्हा हुडहुडी!

पारा 5.5 अंश सेल्सिअसवर

लासलगाव : निफाड तालुका पुन्हा एकदा वातावरण बदलामुळे गारठले आहे. कुंदेवाडी येथील हवामान विभागात निचांकी तापमानाची नोंद होत ते 5.5 अंश सेल्सिअल इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे या गारठ्यातून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. विशेषत: वाफाळलेला चहा आणि गरमागरम दूध प्यायला नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र, अचानक बदलेल्या या वातावरणामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा धास्तावलेला दिसत आहे. तर दुसरीकडे या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

पाकिस्तानच्या कराचीत उठलेल्या धुळीच्या वादळाने आता थेट नाशिककरांच्या उंबर्‍यावर धडक दिल्याने चिंता वाढली आहे. वाढलेल्या गारठ्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. विशेषतः अतिवृष्टीचे दणक्यावर दणके सहन करणारा शेतकरी पुन्हा एकदा धास्तावलाय. या विचित्र हवामानाच द्राक्ष आणि कांदा पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतेय. पाकिस्तानच्या कराचीमध्ये शनिवारी धुळीचे वादळ उठले. रविवारी त्याने गुजरातच्या दिशेने कूच केली. त्याचा तडाखा मुंबई, नाशिकला बसला.

त्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नाशिकमध्ये पहाटेच हलक्या पावसाने हजेरी लावली. शहरातील हवेचा वेग वाढला असून, ताशी 16 ते 20 किमी वेगाने वारे वाहतायत. हवेत बाष्प आणि धुलिकन असल्यामुळे दृश्यमानता कमी झालीय. आगामी तीन दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमधले किमान तापमान 2 ते 4 अंशाने घटून थंडी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. शिवाय येणार्‍या 29 जानेवारीपासून उत्तर भारतातील हिमाचल, उत्तराखंड भागातील वातावरण बदलाचा फटका महाराष्ट्राला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव

अतिशय झपाट्याने बदलेले हवामान आणि सात दिवसांपासून सुरू असलेल्या गारठ्यामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा, द्राक्ष यांच्यावर या हवामानाचा गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे. शेतकरी पिकांवर वेगवेगळी औषधे फवारत आहेत. त्यामुळे एकीकडे खर्च वाढलाय. तर दुसरीकडे धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे या रोगाची भीती वाढली आहे. सध्या कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव दिसत आहे. या हवामानामुळे लाखो रुपये खर्चून लावलेले कांदा पीक आणि द्राक्ष धोक्यात आल्याने शेतकर्‍यांच्या काळजाचा पुन्हा एकदा ठोका चुकला आहे.