Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र आ. हिरेंच्या अपघाताला राजकीय रंग; काय आहे बातमी मागची बातमी?

आ. हिरेंच्या अपघाताला राजकीय रंग; काय आहे बातमी मागची बातमी?

Subscribe

नाशिक : निमातर्फे आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी राज्याच्या दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांना झालेल्या ‘कथित अपघाता’च्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढल्याचे दिसत आहे. हे प्रकरण आता कोणावर शेकणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भाजपच्या आमदार सीमा हिरे या खाली पडल्याचा प्रकार घडला. हा प्रकार जाणीवपूर्वक केला असल्याचा आरोप आमदार हिरे यांच्यासह त्यांचे समर्थक आणि काही भाजप पदाधिकार्‍यांकडून करण्यात आला. या प्रकाराची संतप्त प्रतिक्रिया उमटून काही कार्यकर्त्यांकडून धंनजय बेळे यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला.

- Advertisement -

आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असूनही, त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नसणे, निमंत्रणपत्रिकेत त्यांचे नाव नसणे, त्यानंतरही कार्यक्रमाचे आयोजक व उदघाटक मंत्री द्वयीकडून त्यांची विचारपूसही न करता उदघाटन उरकण्यात आले. त्यामुळे हा सगळा प्रकार पूर्वनियोजित असल्याची चर्चा होऊ लागली आहे. प्रथमदर्शनी आ. हिरे यांचा तोल जाऊन त्या जमिनीवर पडल्याचे दिसत असले तरी या प्रकरणाला आता राजकीय रंग चढविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

बातमी मागची बातमी

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पांजरपोळच्या जागेवर औद्योगिक वसाहत उभारण्याच्या केलेल्या मागणीला आमदार सीमा हिरे यांनी केलेला विरोधच या प्रकारासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. शिवाय, आमदार फरांदे यांनी निमाच्या कार्यालयात बैठक आणि पोलीस आयुक्तांच्या उपस्थित झालेल्या बैठकीस आमदार सीमा हिरे उपस्थित नव्हत्या. त्याचप्रमाणे पांजरपोळ प्रकरणातही काही उद्योजकांनी आमदार फरांदे यांच्या भूमिकेशी सहमती दाखवल्याने आ. हिरे यांची नाराजी होती. हिच नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी ‘टायमिंग’ साधल्याचे बोलले जात आहे.

घिडलेला हा प्रकार गैरसमजातून झालेला आहे. त्यात कोणतेही हेतू पुरस्सर कृत्य झालेले नाही. निमाच्या पदाधिकार्‍यांनी देखील आमदार महोदयांचे समजूत काढली आहे. त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे. अजूनही काही मुद्दे असतील तर चर्चेतून प्रश्न सोडविता येतील. परंतु, या प्रकरणाला कुणी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, ही विनंती. : धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

नियोजनबद्धतेसाठी कौतुकपात्र असलेल्या निमासारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या कार्यक्रमात असा प्रकार घडणे चुकीचे आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल दीर्घकाळपर्यंत आयोजकांकडून कोणतीही दिलगिरी व्यक्त केली गेली नाही. कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होऊ लागल्या नंतर आयोजकांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. हा प्रकार म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असा आहे. : सीमा हिरे, आमदार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -