घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयूपीच्या शेतकर्‍यांचा कळवळा हा राज्य सरकारचा स्टंट : आमदार विखे-पाटलांचा टोला

यूपीच्या शेतकर्‍यांचा कळवळा हा राज्य सरकारचा स्टंट : आमदार विखे-पाटलांचा टोला

Subscribe

हजारो कोटींच्या भ्रष्टचारावरून लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न

शिर्डी : महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या अविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे, ही महाविकास आघाडी सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार ५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांविषयी कळवळा दाखविणार्‍या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकर्‍यांना वार्‍यावर का सोडले, असा सवालही उपस्थित केला.

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात साडपलेल्या शेतकर्‍यांना मदतीच्या कोरड्या आश्वासनांपलीकडे सरकारने काहीही दिलेले नाही. निसर्ग आणि तोक्ते वादळात नुकसान झालेल्यांना सरकारने जाहीर केलेली मदतही अजून पोहोचलेली नाही. पीक विम्याच्या लाभही शेतकर्‍यांना मिळू शकलेला नाही. कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यानंतर सरकार प्रोत्साहन अनुदान देणार होते त्याचे काय झाले याकडे लक्ष वेधून, रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेली जनता अजूनही मदतीची वाट पाहात असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

- Advertisement -

यापूर्वी भाजपबरोबर सत्तेत असताना बांधावर जावून हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीच्या केलेल्या मागणीचाही सोईस्कर विसर शिवसेनेला पडला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. लखीमपूर खेरीमध्ये काय झाले, त्यावर काय कारवाई करायची ते पाहण्यास उत्तर प्रदेश सरकार सक्षम आहे. ही घटना दुर्दैवी आहे, या घटनेचे समर्थन होवूच शकत नाही, पण महाराष्ट्रात रोज शेतकर्‍यांवर मरण ओढवत असताना त्यावर मात्र ठाकरे सरकार चकार शब्द बोलत नाही, याचे आश्चर्य आमदार विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -