येवला तालुक्यात ७० हजार हेक्टरवर खरीप पेरणीची निश्चिती

उत्तर पूर्व भागात चांगला पाऊस, बळीराजाकडून पेरणीला प्रारंभ

प्रसाद गुब्बी । येवला
येवला तालुक्यातील शेतकर्‍यांचे मुख्य पीक असलेल्या मका, सोयाबीन, कापूस या पिकाबरोबरच खरीप हंगामासाठी येवला तालुक्यात ७० हजार क्षेत्रावर कृषी विभागातर्फे पेरणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यंदा कांद्याचे अर्थचक्र बिघडले असून खते, बियाणांसाठी भांडवलासाठी शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ७० हजार १३५ हेक्टरवर खरीप पिकांचे कृषी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून, ३५ हजार ११९ हेक्टरवर मका तर ११ हजार ३९ हेक्टरवर कापूस तर ४ हजार ७१२ हेक्टरवर सोयाबीन या मुख्य पिकांच्या पेरणीबरोबर बाजरी, तूर, मुग, भुईमूग, उडीद या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगामातील संभाव्य क्षेत्र (हेक्टरमध्ये)

बाजरी- ९७३०, मका- ३५११९, तुर-११२८, मुग- ५२४०, सोयाबीन-४७१२ कापूस-११०३९, भुईमूग- २६१४, उडीद-५२५ ,तीळ २०, सूर्यफूल ४, ज्वारी ४.०२ अशी एकूण ७०१३५ हेक्टरवर पेरणी होणार आहे.

रब्बी पिकांचे उत्पादन घटले

रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवडी उशिरा झाल्याने उन्हाची तीव्रता वाढून थंडी कमी झाल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट आली, त्यामुळे जमीन नांगरणे ,नंतर शेकणे गरजेचे होते त्यामुळे जमिनीतील बुरशी नष्ट होते ,मात्र रब्बी हंगामात जमीनच न शकल्याने त्याचा परिणाम रब्बी पिकावर झाला.

टोमॅटोचे क्षेत्र घटले

मागील वर्षी टोमॅटोला मिळालेल्या भावामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवडीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याने टोमॅटो क्षेत्र घटणार आहे, मागील वर्षापेक्षा यावर्षी नर्सरीमध्ये रोपे बुकिंग कमी असुन टोमॅटोची उशिरा लागवड होण्याची शक्यता आहे.

१२४ गावामध्ये एकूण ७०१३५ हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षित आहे. या विविध पिकांचे उत्पादन वाढीसाठी बिजप्रक्रिया, बी.बी.एफ नी पेरणी, १०% रासायनिक खताची बचत करणे, जमीन आरोग्य पत्रिकाप्रमाणे खताचा वापर करणे हे मोहीम स्वरुपामध्ये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी या योजना आपल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात राबवाव्यात व आपले उत्पादन वाढण्यास हातभार लावावा.
– कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी