घरमहाराष्ट्रनाशिकसर्वपक्षीय गोंधळात गुंडाळली महासभा

सर्वपक्षीय गोंधळात गुंडाळली महासभा

Subscribe

हेमलता पाटील - गजानन शेलार यांच्यात हमरीतुमरी, शिवसेनेवरही मिलीजुलीचे आरोप; कोट्यवधींचे विषय विनाचर्चा मंजूर

परिवहन समितीत वर्णी न लागल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी शनिवारी १९ जानेवारीला झालेल्या महासभेत प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळातच महापौरांनी सर्वच विषय विनाचर्चा मंजूर करीत सभेचे कामकाज गुंडाळले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक सत्ताधार्‍यांबरोबर शिवसेनेलाही धारेवर धरीत या दोन्ही पक्षांची मिलीजुली असल्याचा आरोप करीत असतानाच काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीलाच घरचा आहेर देत तुम्हीच मॅनेज असल्याचा दावा केला. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार डॉ. पाटील यांच्यावर धावून गेल्याने वातावरण चिघळले. महिलेच्या अंगावर धाऊन जाणार्‍या शेलार यांचा उपस्थित महिला नगरसेवकांनी जाहीरपणे निषेध व्यक्त केला.

शहर बससेवेचा प्रस्ताव मंजूर करताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व शिवसेनेने बससेवा सुरू करताना लोकप्रतिनिधींची परिवहन समिती गठीत करण्याची मागणी गेल्या महासभेत केली होती. तसे पत्र देखील सादर केले होते. भाजपकडून सभागृह नेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी देखील लोकप्रतिनिधींची परिवहन समिती गठीत करण्याचे समर्थन केले होते. त्यानुसार महापौर रंजना भानसी यांनी आदेश देताना लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली परिवहन समिती गठीत करण्याचे आदेशित केले होते; परंतु इतिवृत्तात मात्र समिती ऐवजी कंपनीकरणाचा ठराव करण्यात आला व त्याचे इतिवृत्त आज महासभेवर मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, अपक्ष गुरुमित बग्गा यांनी विरोध केला. इतिवृत्ताचे वाचन करण्याची मागणी करताना विरोध नोंदविण्याची मागणी त्यांनी केली. महापौर भानसी यांनी दुरुस्तीसह इतिवृत्त मंजूरीच्या सूचना दिल्यानंतर शेलार, मुशीर सैय्यद यांनी पीठासनावर चढून महापौरांना जाब विचारण्यास सुरुवात केली. सत्ताधारी भाजपवर मॅनेज झाल्याचा तसेच दलाली घेतल्याचा आरोप केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. त्यात महापौर भानसी यांनी विषयांना विनाचर्चा मंजूरी देत राष्ट्रगीत सुरू करण्याचे आदेशित केले.

- Advertisement -

 

प्रति महासभेत फूट

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, शिवसेनेने महापौरांच्या सभा गुंडाळण्याच्या भूमिकेचा निषेध करत सभागृहातच प्रतिमहासभा घेण्याचे जाहीर केले. परंतु काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी गजानन शेलार, मुशीर सैय्यद व गुरुमीत बग्गा यांच्यावर चर्चा होऊ न देता महासभा उधळतं “मॅनेज’ केल्याचा आरोप केल्याने प्रति महासभेचा नूर पालटला. शेलार यांनी पाटील यांच्याकडे बोट दाखवत अरेरावीची भाषा केली. त्याला प्रत्युत्तर देताना दोघेही एकमेकांवर धावून गेले. शिवराळ भाषेतील उच्चारामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, सर्वपक्षीय नगरसेवकांना दोघांना बाजुला करावे लागले.

- Advertisement -

शिवसेनेची निदर्शने

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे प्रति महासभा देखील उधळली गेल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहातून काढता पाय घेत सभागृहाबाहेर निदर्शने केली. महापौरांच्या रामायण निवासस्थानी महापौरांना भेटण्यासाठी नगरसेवक गेले, परंतु तेथे महापौर नसल्याने रामायण वर निदर्शने केली.

पदाधिकारी म्हणाले…

मी महापौर असल्याने पीठासनावर कोणते विषय चर्चेस घ्यायचे हे ठरविण्याचा अधिकार माझा आहे. सभागृहाचा शिष्टाचार तोडण्याचा प्रयत्न कुणी करत असेल नाईलाजास्तव मला माझ्या अधिकाराचा वापर करावा लागेल. महिलांचा मान राखणे हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे, हे देखील प्रत्येकाने लक्षात ठेवावे.
रंजना भानसी, महापौर

शिवसेना आणि भाजपची मिलीजुली असल्याचा आरोप शेलारांनी केला. मात्र त्यांच्याच सहकारी पक्षातील डॉ. हेमलता पाटील यांनी बग्गा आणि शेलारांवरच आरोप करीत या दोघांनी ठरवून सभा उधळल्याचा आरोप केला. त्यामुळे शेलारांनी आत्मपरीक्षण करावे. परिवहन समितीच्या संचालकपदाचा अर्ज मी अद्याप भरलेलाही नाही. याउलट मी फेरप्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले आहे.
अजय बोरस्ते, विरोधीपक्ष नेता

महासभेत काही संशयास्पद आर्थिक विषय होते. मखमलाबाद येथील शेतकर्‍यांच्या स्मार्ट सिटी अंतर्गत जागा संपादनाचा विषय देखील यामध्ये होता. सर्व विषयांवर गांभीर्याने चर्चा होणे अपेक्षीत होते. असे असताना जादा विषयांची कुरापत काढून किंवा इतिवृत्तावरुन हमरीतुमरी करुन पीठासनाकडे धाव घेतली. महासभा गुंडाळण्यात महापौरांना मदत करण्यात आली. यामध्ये स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा खटाटोप दिसतो.
– डॉ. हेमलता पाटील

मुळात हेमलता पाटील यांचे आरोप साफ खोटे आहेत. इतिवृत्त दुरुस्त करुन सादर होणे गरजेचे असताना तसे न करता महापौरांनी अधिकारांचा गैरवापर करुन महासभा गुंडाळली. या विरोधात तसेच नगरसचिवांच्या कामकाजाविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेऊ.
– गजानन शेलार, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -