नव्या जुन्याचा संगम “दहीपूल”

नाशिकमधील नेहरू चौकापासून थेट मेनरोडपर्यंत जाणारा विस्तृत व वर्दळीचा वीर सावरकर पथ (चांदवडकर लेन) हा रस्ता आताच्या कमला विजय हॉटेल, सुंगधी साडी केंद्र या कोपर्‍यापर्यंतच पूर्वी अस्तित्त्वात होता. दक्षिणोत्तर असलेला सरस्वती नाला खंदकासारखा, तर नाल्याच्या पलीकडे कदम पेंटर व धारकर यांच्या दुकानामधील भाग प्रचंड वाड्यामुळे भिंतीप्रमाणे आडवा इथपर्यंतच रस्ता संपत असे व भिकुसा विडी कारखान्या(शुक्ल गल्ली)कडून उत्तरेला दिमोठे बोळ, भागवत तबेला मार्गाने सरकारवाड्याकडे अरूंद बोळीतून जावे. लागत असे. नेहरू चौकापुढील चौक म्हणजे दहीपूल. मातीचे गाडगे व माठात या चौकात पूर्वी दूधदहीचे विक्रीचे केंद्र होते. त्यावरून या चौकाला दहीपूल संबोधले जात असे. जोडीला फुलांचा बाजार येथेच भरत होता. दक्षिणेकडे जाणारी हुंडीवाला लेन व उत्तरेकडे जाणारी पगडबंद लेन, हे नाशिकमधील मुख्य रस्ते पूर्वी दगडी खांडक्यांचे होते. परंतु, वरील व्यवसायामुळे त्या काळातील व्यापारपेठेचा चौक म्हणून प्रसिद्ध होता.

नाशिकला यात्रा व धार्मिक विधीसाठी भाविकांना नदीपात्राकडे या चौकातून जावे लागत असे. ब्रह्मवृंदांची पूजेसाठी लागणारी फुले, तुळस, बेलपत्र आणि अभिषेकासाठी दही-दूध, नित्यपूजेसाठी लागणारी फुले आणि त्याचबरोबर वेण्या व गजरे खरेदीसाठी गृहिणींची गर्दी उसळत असे. मात्र, सकाळी व सायंकाळी एक प्रसन्न वातावरण असलेला २५० ते ३०० वर्षांपूर्वीपासून हा भाग होता. पहाट होताच गंगास्नानासाठी जाताना रामनामाचा गजर चाले. कोठेतरी एखादा साधू किंवा भिक्षेकरी एकतारीवर भजन, टाळमृदुंग वाजवित जाणारा वारकरी समूह तर वासुदेव आणि ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा’, अशी करूणाकराला साद घालीत जाणारे रामदासी बुवा खड्या आवाजात करूणा भाकीत असत. पगडी, पागोटे, शेला, पुणेरी जोडे, शेंडीची गाठ मारून गंगेकडे जाण्यापूर्वी पूजाअर्चा सिद्धतेसाठी खरेदी करणारे भटजी यांचा या चौकात मेळावा भरत असे. सोनसकाळी हे अत्यंत मोहक दृश्य होते. आणखी एक विशेष म्हणजे, व्यवहारातील चलन म्हणजे पैसा, मात्र दह्या-दुधाची व फुलांच्या विक्रीचा एक भाग म्हणजे छोट्याशा ताट किंवा वाटीत आलेल्या धान्याच्या मोबदल्यात देवाणघेवाण चालत असे.

कमला-विजय हॉटेलसमोर आताचे सुगंधी साडी केंद्र, रिक्षा स्टँडच्या जागेत, त्या काळातील प्रसिद्ध असे लक्ष्मीनारायण मंदिर होते. हे मंदिर २०० ते २५० वर्षांपूर्वी वामन धाकदेव चौघुले यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांनी बांधले होते. अनेक प्रसिध्द व्यक्तींची कथा, कीर्तने, प्रवचने या मंदिरात होत. रस्ता रुंदीकरणात ते आता अस्तित्त्वात नाही. चांदवडकरांच्या मागील पोळ यांच्या वाड्यात मूर्ती हलविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नाल्यापलीकडील घरे पाडून पूर्वीच्या चांदवडकर वाड्याच्या बोळापर्यंत रस्ता तयार करून सलग वीर सावरकपर पथ हा रस्ता अस्तित्त्वात आला आहे. दहीपुलाच्या चौकाच्या दक्षिणेला शंभर वर्षांपूर्वी सराफ यांच्या पुढाकाराने बांधलेले जैन मंदिर आहे, तर छगनशेठ शहा यांच्या अलिशान इमारतीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी काही काळ पाहणचार घेतला होता. शेठजींकडे असलेली बग्गी (घोडागाडी) त्यांच्या वैभवात भर घालीत असे.

याच इमारतीत काकासाहेब सोलापूरकर, वैद्य काळे यांचा दवाखाना होता. संस्मरणीय प्रसंग, महत्त्वाच्या घडामोडी, भूतकाळातील गुजगोष्टी, आठवणी, कित्येक रोमांचकारी प्रसंग व अनेक मान्यवरांच्या वास्तव्याने मोहरलेला, मंतरलेला दहीपूल म्हणजे नव्या-जुन्यांचा संगम साधणारा सेतू आहे. या परिसरातील राजा कर्डिले हे राष्ट्र सेवा दलाचे नावाजलेले कार्यकर्ते. स्फूर्तिदायक राष्ट्रीय गीते संचलन, चळवळीत घणाघाती वक्तृत्व, शौर्यकथा सांगून मंत्रमुग्ध करणारे, ध्येयवादाचा झंझावात असलेले व्यक्तिमत्त्व होते. प्रा. प्रकाश कर्डिले नामवंत प्राध्यापक. त्यांच्या पुस्तकालयात अनेक विद्वज्जनांची मैफल जमत असे. एचपीटी महाविद्यालयाचे जुन्या काळातील सर्वेश्वरा ज्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी देशात व परदेशात संशोधक अधिकारी, उद्योगपती, साहित्य या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली, असे नामवंत प्राध्यापक भा. ल. पाटणकर, सौंदर्य मीमांसाकार म्हणून प्रसिध्द असलेले व नुकतेच दिवंगत झालेले रा. भा. पाटणकर यांचे रानडे वाड्यात वास्तव्य होते. सुगंधी बंधूंचा नाशिकच्या शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात नावलौकिक होता. सुप्रसिद्ध साहित्यिक मनोहर शहाणे यांचे जन्मस्थळ, त्यांचा शहाणेवाडा हादेखील दहीपुलावरच आहे.

याच ठिकाणी नवजीवन मंडळाचे निर्माते साईनाथ ब्रास बँडचे संचालक, नाशिकमधील प्रसिध्द मोगरे धुलाई केंद्राचे संचालक व कर्तबगार मंडळींपैकी अग्रणी छोटू मोगरे, तसेच गणपतसिंगजी परदेशी, मिठाईवाले पाराशरे, वाघ बंधूंची सोडावॉटर फॅक्टरी त्याचबरोबर बाबूराव निंबाळकर, चुडामण काची, बह्मण व कुलकर्णी ही नाशिकमध्ये दबदबा निर्माण करणारी मंडळी आणि प्रकाश मित्रमंडळ ही नावाजलेली संस्था याच चौकात होती. शंकरराव जाधव यांचे कमला-विजय हे चहा व मिसळ यासाठी प्रसिध्द असलेले हॉटेल संपूर्ण नाशिक शहरात अग्रगण्य होते. शंकररावांचे पुत्र, वसंत (अण्णा), विजय, मधुकर या जाधव बंधूंनी कमला-विजय ला रूचकर नाष्टा करण्याच्या निमित्ताने रोज सकाळ-सायंकाळी सांस्कृतिक क्षेत्रातील व रंगकर्मी मंडळींची गप्पाष्टकांचे व नव्या योजना, मनसुबे, खलबते यांच्या सांस्कृतिक केंद्राचे स्वरुप दिले.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)