घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हापरिषदेच्या ऑनलाईन सभेत ऑफलाईन गोंधळ

जिल्हापरिषदेच्या ऑनलाईन सभेत ऑफलाईन गोंधळ

Subscribe

जिल्हा परिषद अर्थसंकल्पीय सभा सभागृहात घेण्यासाठी सदस्यांचा ठिय्या

नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यकाळातील अखेरचे अंदाजपत्रक प्रत्यक्ष सभागृहात मांडण्याची संधी मिळावी म्हणून सदस्यांनी ऑनलाईन सभा रद्द करण्याची मागणी करत अभुतपूर्व गोंधळ घातला. सदस्यांची मागणी विचारात घेतली जात नसल्याचे बघून आक्रमक झालेल्या विरोधकांसह सर्वपक्षिय सदस्यांनी जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या मांडला.

प्रशासन व पदाधिकार्‍यांचा निषेध नोंदवायचा आहे तर अध्यक्षांच्या दालनातच जमिनीवर बसून तीव्र विरोध करु, अशी भूमिका या आंदोलनकर्त्या सदस्यांनी घेतली. अध्यक्षांच्या दालनाकडे धाव घेत या सदस्यांनी जमिनीवर बसून प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत ऑनलाईन सभा रद्द करुन प्रत्यक्ष सभागृहात सभा होणार नाही, तोपर्यंत जागेवरुन उठणारच नाही, अशी भूमिका भाजपचे गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी घेतली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याशेजारी ठिय्या मांडलेले राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव, सदस्य यशवंत शिरसाठ, सिध्दार्थ वनारसे, यशवंत ढिकले, लता बच्छाव, सुरेश कमानकर, गितांजली पवार-गोळे, ज्योती जाधव यांनीही रोष व्यक्त केला.

- Advertisement -

ऑनलाईन सभा रद्द होत नाही, तोपर्यंत जागेवरुन उठणार नाही, असा पवित्रा भाजपचे गटनेते डॉ.कुंभार्डे यांनी घेतल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली. कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डॉ.कुंभार्डे यांना खुर्चीत बसून आपले म्हणणे मांडण्याची विनंती केली. मात्र,डॉ.कुंभार्डे यांनी आपली भूमिका कायम ठेवत पदाधिकार्‍यांसह प्रशासनावरही सडेतोड आरोप केले. प्रशासनाच्या दबावाला बळी पडून अध्यक्ष ऑनलाईन सभेचा आग्रह धरत आहेत. सोमवारी (दि.28) होत असलेली ऑनलाईन सभा रद्द करुन बुधवारी जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात प्रत्यक्ष सभा घेण्याचे आवाहन त्यांनी केली. परंतु, अर्थसंकल्पीय सभा तहकूब करणे शक्य नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे फक्त अर्थसंकल्पीय सभा ऑनलाईन घ्या, उर्वरित विषयांसाठी प्रत्यक्ष सभागृहात बैठक घेण्याचे अध्यक्षांनी मान्य केले. प्रशासनानेही लागलीच ऑनलाईन सभा सुरु केली.

सदस्यांचा विरोध डावलून ऑनलाईन सभा चालवली जात असल्याचे बघितल्यानंतर सिध्दार्थ वनारसे, दीपक शिरसाठ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. डॉ.कुंभार्डे हे आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवत असल्याचे बघितल्यानंतर त्यांच्याच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड यांनी डॉ.कुंभार्डे यांच्याकडे जात त्यांना खूर्चीवर बसण्याचे आवाहन केले. त्यांच्या विनंतीला मान देत अखेर अर्थसंकल्पीय सभा घेण्याच्या अटीवर त्यांनी ऑनलाईन सभेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

दरम्यान, भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह जिल्ह्यातील दिवंगत शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.28) ऑनलाईन अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली. यावेळी पदाधिकार्‍यांसह सदस्य सहभागी झाले होते.

उपाध्यक्षांची यशस्वी मध्यस्थी

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अत्यंत मितभाषी सदस्य व पदाधिकारी म्हणून ओळख असलेले उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड यांनी पहिल्यांदाच मध्यस्थीची भूमिका घेतली. डॉ.कुंभार्डे यांची मनधरणीसाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेतला. डॉक्टरसाहेब मी सांगतो म्हणून ऐका अशी विनंती तर त्यांनी केलीच शिवाय जमिनीवर बसलेले डॉ.कुंभार्डे यांना हातधरुन उठवले आणि खुर्चीत बसवले. त्यामुळे चांदवड तालुक्यात एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे सदस्य एकत्र झाल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -