अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

नाशिक  : सैन्य दलातील भरतीप्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली. मात्र, या योजनेमुळे देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचा आरोप करत नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सोमवारी (दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, अग्निवीर योजनेचा कार्यकाळ व शैक्षणिक पात्रता लक्षात घेता अग्नीवीर तांत्रिक कामासाठी कोणत्याच उपयोगाचे ठरणार नाही. आज तीनही दलांची कार्यक्षमता फक्त अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांवरच अवलंबून आहे.

भारतीय हवाई दलात ५० टक्क्यांपेक्षा अधिक वायुसैनिक तांत्रिक विभागात काम करतात. लढाऊ विमाने, रडार, मिसाइल संदेश प्रणाली, संगणक यांना चालू स्थितीत ठेवणे आवश्यक असल्यास ती कमीत कमी वेळेत करणे हे वायुसैनिकांचे कामाचे स्वरूप असते. त्यामुळे देशाला आज अग्निवीरांची नव्हे तर तांत्रिक योद्ध्यांची गरज आहे. त्यामुळे ही योजना रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, माजी नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, राजेंद्र बागूल, लक्ष्मण जयभावे, हनीफ बशीर, उद्धव पवार, समिना मेमन, लक्ष्मण धोत्रे आदी सहभागी झाले होते.

स्मार्ट सिटी कामांची चौकशी करा

आंदोलनानंतर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेत स्मार्ट सिटीच्या कामांबाबत निवेदन देण्यात आले. शहरातील सराफ बाजार, मेनरोड, शालिमार, जुने नाशिक या भागांतील रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. पहिल्याच पावसात पाणी साचून व्यापारी व व्यावसायिकांचे नुकसान झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे.