काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष शरद आहेरांचा राजीनामा

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे सुपूर्द; जूनमध्ये नवीन अध्यक्षाची निवड

नाशिक : एक व्यक्ती, एक पद’ या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची प्रभारी जबाबदारी होती.

शरद आहेर यांची फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. तेव्हापासून आहेर यांच्याकडे शहराध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष या दोन्ही पदांची धुरा होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली मध्यंतरी सुरू झाल्या. त्यादृष्टीने तयारी करत नाशिकचे माजी उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी अपक्ष नगरसेवकपदाचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बग्गांच्या रुपाने नाशिकमधील संघटन वाढण्यास मदत होईल आणि पक्षाला विजयाच्या मार्गाने धावणे सोपे जाईल, अशी आशा निर्माण झालेली असताना बग्गा यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ अद्याप पडलेली नाही. त्यामुळे त्यांनीही ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेत स्वत:चा प्रभाग ‘सेफ’ करण्याचे प्रयत्न सुरू केले.

काँग्रेसचे निष्ठावान असलेल्या बग्गा यांना महापालिकेच्या निवडणुकीत २०१२ मध्ये काँग्रेसने नगरसेवकपदाचे तिकीट नाकारल्यानंतर बग्गा यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवल्यानंतर पुन्हा २०१७  च्या निवडणुकीतही ते अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र, आता २०२२  मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे नगरसेवकपद कायम ठेवून त्यांना पक्षप्रवेश करणे शक्य नसल्याने, बग्गा यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु, आता जूनमध्ये होणार्‍या पक्षांतर्गत निवडणुकीत बुथप्रमुख व शहराध्यक्ष निवडला जाईल. यात बग्गा यांना संधी मिळते की नव्या नेतृत्वाकडे पक्षाची धुरा जाते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महिला शहराध्यक्षपदी स्वाती जाधव

१३ वर्षांपासून शहराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत असलेल्या वत्सला खैरे यांना महिला प्रदेश कार्यकारिणीत निमंत्रित सदस्यपदी बढती मिळाली आहे. महिला शहराध्यक्षांच्या रिक्त जागी वत्सला खैरे यांच्या कन्या स्वाती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महिला प्रदेश कार्यकारिणीत जाधव यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्षांचा पदभार देण्यात आला होता. मात्र ही तांत्रिक चूक असल्याचे प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी शिर्डीतील शिबिरात स्पष्ट केले.

ही नावे आहेत चर्चेत!

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी सरचिटणीस भरत टाकेकर, माजी नगरसेवक राहुल दिवे, प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील, माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव, माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे यांच्या नावाची आता शहराध्यक्षपदासाठी चर्चा सुरु झाली आहे. जातिपातीचे संतुलन साधणार्‍या व वरिष्ठांची मनधरणी करणार्‍या नेत्यास शहराध्यक्ष म्हणून नियुक्त करावे लागणार आहे.