घरमहाराष्ट्रनाशिकयुतीचे बालेकिल्ले भेदण्यासाठी आघाडीचे शर्थीचे प्रयत्न

युतीचे बालेकिल्ले भेदण्यासाठी आघाडीचे शर्थीचे प्रयत्न

Subscribe

नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार आणि शिर्डी मतदार संघाचा समावेश

उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी पाच मतदार संघात सोमवारी २९ एप्रिलला मतदान होत आहे. यात नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार आणि शिर्डी मतदार संघाचा समावेश आहे. उर्वरित अहमदनगर, जळगाव आणि रावेर या मतदारसंघांत तिसर्‍या टप्प्यातच मतदान झाले. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील आठही मतदारसंघ सध्या युतीच्या ताब्यात असून ते आपल्याकडे ओढण्यासाठी यंदा आघाडीने शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत आहे. त्यासाठी जिल्हाप्रशासन आणि पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. रविवारी सकाळी विधानसभानिहाय कर्मचार्‍यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. निवडणुकीसाठी २७ हजार १९५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ७ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आहे. संवेदनशील केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ६८ क्रिटीकल मतदान केंद्र असून यात नाशिकमध्ये ५३ तर दिंडोरीत १५ केंद्र क्रिटीकल आहेत. जिल्ह्यातील ४७२ मतदान केंद्रावर वेब कास्टींगद्वारे मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण निवडणूक आयोगाला करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र हा युतीचा बालेकिल्ला असल्याने तो भेदून काढण्यासाठी यंदा आघाडीने जीवाचे रान केले आहे.

- Advertisement -

नाशिक : हेमंत गोडसे विरुद्ध समीर भुजबळ

नाशिक मतदार संघात युतीच्या वतीने विद्यमान खासदार हेमंत गोडसे तर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ नशीब आजमावत आहेत. त्यांना अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी आव्हान दिले आहे. या निवडणुकीत छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दिंडोरी : डॉ. भारती पवार विरुद्ध धनराज महाले

दिंडोरी लोकसभा मतदार संघात युतीच्या डॉ. भारती पवार यांचा सामना आघाडीचे धनराज महाले यांच्याशी होणार आहे. माकपचे उमेदवार आमदार जीवा पांडू गावित यांचीही मते येथे निर्णायक ठरणार आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे दोन्ही प्रमुख उमेदवार आयात केलेले आहेत.

- Advertisement -

धुळे: डॉ.सुभाष भामरे विरुद्ध कुणाल पाटील

धुळे मतदार संघात केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे यांना यंदा पुन्हा एकदा युतीची उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा सामना आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्याशी होत आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनील गोटे यांनी अपक्ष उमेदवारी करुन शड्डू ठोकला आहे.

नंदुरबार : हिना गावीत विरुद्ध के. सी. पाडवी

नंदुरबार मतदारसंघात युतीच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार हिना गावित याची आघाडीचे उमेदवार के. सी. पाडवी यांच्याशी लढत होत आहे. भाजपचे बंडखोर सुहास नटावदकर यांनी अपक्ष उमेदवारी करुन गावीत यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.

शिर्डी : सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब कांबळे

शिर्डी मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे, अपक्ष व भाजपचे बंडखोर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह २० उमेदवार रिंगणात आहेत.

मतदारसंघनिहाय मतदार

  • १८ लाख ८२ हजार ४६ मतदार नाशिक मतदारसंघात
  • १७ लाख २८ हजार ६५१ मतदार दिंडोरी मतदारसंघात
  • १९ लाख ४ हजार ८५९ मतदार धुळे मतदारसंघात
  • १८ लाख ७० हजार ११७ मतदार नंदुरबार मतदारसंघात
  • १५ लाख ८४ हजार मतदार शिर्डी मतदारसंघात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -