नाशिक बाजार समिती तीन दिवस बंद

सभापती संपतराव सकाळे : गेल्या दोन दिवसांत दोन करोना पॉझिटिव्ह

NSK Bajar samiti samitee

पंचवटी : गेल्या दोन दिवसांत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारात दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने बाजार समितीचे व्यवहार शुक्रवार (दि.29) पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सभापती संपतराव सकाळे यांनी घेतला आहे. त्यामुळे मंगळवार, बुधवार व गुरुवारी बाजार समितीत लिलाव प्रक्रिया होणार नाही.
भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीच्या निमित्ताने नाशिक आणि मुंबईच्या बाजारात ये-जा करणारा एक भाजीपाला व्यापारी शनिवारी (दि.23) करोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाला आहे. त्यानंतर अवघ्या 24तासात पुन्हा बाजार समीतीच्या आवारातील एक हॉटेल चालक करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी सभपातींनी पुढील तीन दिवस लिलाव बंद ठेवले आहेत. शेतकरी भाजीपाला लिलावासाठी बाजार समितीत येत असतात. नाशिक बाजार समीती वगळता करोनाच्या पाश्वभूमीवर राज्यातील बहुतांशी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होते. शासनाने ठरवुन दिलेले नियम, सूचनांचे काटेकोरपणे पालन करत बाजार समितीने आजपर्यंत मार्केट बंद ठेवलेले नाही; परंतु, गेल्या दोन दिवसात एका भाजीपाला व्यापार्‍यासह बाजार समितीच्या आवारात असलेल्या हॉटेल चालकाचा करोना पॉझिटीव्ह अहवाल आला आहे. यामुळे बाजार समितीच्या आवारात येणार्‍या व्यापारी, हमाल, मापारी यांच्यासह बाजार समिती संचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसांत करोनाचे रुग्ण आढळल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस लिलाव बंद ठेवले आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेतला. या तीन दिवसांत बाजार समितीचा आवार सॅनिटाईज केला जाईल.
-सभापती संपतराव सकाळे, (कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक)