घरमहाराष्ट्रनाशिकबांधकाम मजुरांची सुरक्षा वार्‍यावर

बांधकाम मजुरांची सुरक्षा वार्‍यावर

Subscribe

कायद्याची पायमल्ली करून बांधकामस्थळी मजुरांची पिळवणूक

नाशिक आणलेल्या असंघटीत मजुरांना बांधकामस्थळी मुक्कामी असताना मुलभूत सुविधा, सुरक्षा पुरवण्याची तरतूद इमारत व इतर बांधकाम मजूर (बीओसीडब्लू) कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. मात्र, या कायद्याची पायमल्ली करून बांधकामस्थळी मजुरांकडून काम करून घेतले जाते. त्यामुळे घटनास्थळी अपघात, सर्पदंश, कामात दुखापती होऊन कामगारांना जीव गमावण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

इमारत बांधकाम उपक्रमात गुंतलेल्या मजुरांनी एकाच ठिकाणी 90 दिवस काम केले, तर त्यांची कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणी करून सुरक्षा कीट घेण्याची प्रक्रिया कामगार उपायुक्त, बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांना करावी लागते. मात्र, नाशिकमधील बांधकाम व्यवसायात परप्रांतीय मजूर आणले जात असल्याने ‘बीओसीडब्लू’ कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे उघड झालेले आहे. गंगापूर रोड येथे घडलेल्या घटनेत 4 परप्रांतीय बांधकाम मजूर ठार झालेले असताना कामगार उपायुक्त कार्यालयाकडून त्यांची नोंदणी प्रक्रिया गुलदस्त्यात होती. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात बीओसीडब्लु कायद्याची पायमल्ली होत असल्याचे आणि बांधकाम ठेकेदारांकडून याकडे कानाडोळा होत असल्याचे बोलले जात आहे.
या आठवड्यात पुणे, मुंबई व नाशिक येथे अपुर्‍या व्यवस्थेमुळे मजुरांना जीव गमवावाल लागला. यावरून बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. बांधकामासाठी प्रामुख्याने बिहार, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेशातून ठेकदाराकडून मजूर आणले जातात. तसेच विदर्भ, मराठवाडा भागातील बेरोजगार नाशिक, मुंबई, पुणे आदी शहरात कामासाठी येतात. त्यांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते पत्र्यांचे शेड टाकून केली जाते. या ठिकाणी त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय आदी मुलभूत गरजाबाबत त्रुटी असतात. त्यामुळे कामगारांची कुचंबना होते. तसेच कामाच्या दरम्यान त्यांना अपघात झाल्यास प्रथमोपचाराची व्यवस्था नसते. त्यामुळे दुर्घटना घडल्यास वेळीच प्राथमिक उपचारही मिळत नाहीत. तसेच कुटंब सोबत असल्यास मुलांच्या शिक्षणाची परवड होते, अशी तक्रार मजुरांची असते. मात्र, बांधकाम ठेकेदाराकडून याकडे दुर्लक्ष करून काम पूर्ण करण्याचा तगादा लावला जातो.

- Advertisement -

‘बीओसीडब्लू’मधील तरतुदी

  • असंघटीत कामगारांची नोंदणी
  • विमा संरक्षण सुरक्षा कीट प्रदान सुविधा
  • अंत्यविधी, उपचारासाठी तत्काळ मदत
  • मजूर विधवांना 6 वर्षे ठराविक रक्कम
  • मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था

मृत कामगारांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी

गंगापूररोड परिसरात बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तेथे ‘बीओसीडब्लू’ कायद्यानुसार कामगारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरू केली होती. घटनेत मृत झालेल्या कामगारांना बांधकाम व्यावसायिकांनी भरपाई द्यावी, यासाठी कार्यवाही करण्यात येईल. तसेच प्रत्येक इमारत बांधकामाच्या प्रत्येक ठिकाणी कामगार नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. – जी. जे. दाभाडे, नाशिक विभागीय कामगार उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -