घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रठेकेदार-कर्मचारी संभाषण प्रकरण : उद्धट ठेकेदार बाजूलाच; महापालिकेकडून कर्मचाऱ्याचीच उलटतपासणी

ठेकेदार-कर्मचारी संभाषण प्रकरण : उद्धट ठेकेदार बाजूलाच; महापालिकेकडून कर्मचाऱ्याचीच उलटतपासणी

Subscribe

नाशिक : ‘नागरिकांचा जीव जात असेल तर जाऊ दे, तू कशाला मध्ये पडतो’, अशी निष्काळजीपणे विचारणा करणारा घंटागाडी ठेकेदार चेतन बोरा याच्यावर प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना; प्रशासन बोराच्या चुकीवर पांघरुन घालत स्वच्छता कर्मचारी आणि बोरा यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल कशी झाली, याचा शोध घेण्यातच व्यस्त आहेे. प्रशासनाला महापालिकेच्या कर्मचार्‍यांची नाहीच नाही, परंतु नागरिकांचीही काळजी नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.

महापालिकेकडून पूर्व व पश्चिम विभागातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी मे. वॉटरग्रेस कंपनीला ठेका दिल आहे. काही दिवसांपूर्वी एका स्वच्छता निरीक्षकाने घंटागाडीचे टायर फुटल्याची तक्रार ठेकेदार बोरा यांच्याकडे केली. मात्र, या तक्रारीचे निराकरण न झाल्याने संबंधित स्वच्छता निरीक्षकाने महापालिकेच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर ही बाब टाकली. त्याचा राग आल्याने बोरा यांनी अर्वाच्य शब्दांत स्वच्छता निरीक्षकाला सुनावले. या दोघांच्या संभाषणाचे कॉल रेकॉर्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात बोरा यांनी स्वच्छता निरीक्षकाला, ‘नागरिकांचा जीव जाईल तर ते नागरिक पाहतील. तू कशाला मध्ये पडतो’ असे सुनावले. महापालिकेच्या कर्मचार्‍याला एक ठेकेदार अशा पद्धतीने बोलतो, शिवाय नागरिकांच्या जीवाचीही पर्वा त्याला नसल्याचे त्याच्या संभाषणावरुन लक्षात येते. या पार्श्वभूमीवर नागरिकांची काळजी न करता कर्तव्यात कसूर करणे तसेच, महापालिकेच्या कायम कर्मचार्‍याला धमकावणीच्या सूरात आणि अर्वाच्य भाषेत बोलण्याची बाब गंभीर आहे. ठेकेदाराला आज सूट दिली तर त्याची मग्रुरी अधिक वाढत जाईल.

- Advertisement -

महत्वाचे म्हणजे ठेकेदारावर यापूर्वीही अनेक आरोप आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. अशा परिस्थितीत ऑडिओ क्लिपची शहानिशा झाल्यानंतर प्रशासनाने ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. त्यात तो दोषी आहे की नाही हे न्यायालयात सिद्ध होईल. परंतु, त्याचा गुन्हा सिद्ध होऊच नये यासाठी प्रशासन आतापासूनच तयारी करताना दिसते. त्याचाच भाग म्हणून कर्मचार्‍याचीच कसून चौकशी करण्याचे काम सध्या सुरू आहे, जेणेकरुन वेळकाढू भूमिकेतून ठेकेदाराला मोकाट सोडता येईल. शिवाय अशा चौकशांमुळे कर्मचार्‍यावरही दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे.

अधिकार्‍याला न्याय, मग स्वच्छता कर्मचार्‍यावर अन्याय का?

महापालिकेच्या एका महिला अधिकार्‍याविषयी सामाजिक कार्यकर्त्याने फेसबुक लाईव्हमध्ये अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा दावा करीत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पुरावा म्हणून फेसबुक लाईव्हच्या फुटेजचा वापर करण्यात आला होता. मात्र, हाच न्याय महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍याला प्रशासनाने दिलेला नाही. त्याच्याशी अर्वाच्य भाषेत संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप प्रशासनापर्यंत पोहोचलेली असतानाही ठेकेदारावर मेहरबानी दाखवली जात आहे. अधिकार्‍याला कुणी बोलल्यास त्यावर गुन्हा दाखल होतो मग स्वच्छता कर्मचार्‍याला तो न्याय का लागू होत नाही? स्वच्छता कर्मचार्‍याला महापालिका प्रशासनाच्या लेखी आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा नाही का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

स्वच्छता कर्मचार्‍याने कर्तव्यच निभावले

घंटागाडीचे टायर फुटल्याची तक्रार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केल्याचा राग येऊन ठेकेदाराने संबंधित स्वच्छता कर्मचार्‍याला अर्वाच्य भाषेत बोलण्याचे धारिष्ठ्य दाखवले. घंटागाडीचे टायर फुटल्याची तक्रार करण्याचे अधिकार स्वच्छता निरीक्षकाला आहे का, असा प्रश्न आता ठेकेदाराच्या समर्थकांकडून विचारला जात आहे. शिवाय वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्येही ठेकेदाराकडून असाच सूर आळवला जात आहे. वास्तविक, घंटागाडीचे टायर फुटलेले असले तर त्याची तक्रार महापालिकेचे कर्मचारीच काय सर्वसामान्य नागरिकही करू शकतात. विशेषत: महापालिकेच्या कामकाजात काही त्रुटी आढळत असतील आणि त्या लक्षात येत असतील, तर त्याची जाणीव वरिष्ठांना करुन देण्याचे कर्तव्य प्रत्येक कर्मचार्‍याचे असते. त्यामुळे स्वच्छता निरीक्षकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात काहीही अर्थ नसल्याचे स्पष्ट होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -