वादग्रस्त वक्तव्य : काँग्रेस पक्षातर्फे बोंडेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

राज्यात काँग्रेसतर्फे बोंडेंच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक : माजी कृषीमंत्री व भाजप नेते अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शहरात बुधवारी (दि.१९) काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बोंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत भद्रकाली पोलीस निवेदन देत कारवाईची मागणी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात डॉ. अनिल बोंडे यांनी ट्विटरवर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे. त्यातील वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यात काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त केला जात आहे. अनिल बोंडेंकडून काँग्रेस पक्षाची बदनामी केली जात आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन अटक करावी, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेसतर्फे करण्यात आली.

याप्रकरणी काँग्रेसतर्फे भद्रकाली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. त्यापूर्वी बोंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शरद आहेर, निलेश खैरे, डॉ. वसंत ठाकूर, सोमनाथ मोहिते, सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.