साहित्य संमेलनस्थळी १२४ रसिकांनी घेतली कोरोना प्रतिबंध लस

दोन मुख्य प्रवेशव्दारांवर थर्मल स्कॅनिंग, रॅपिड टेस्ट, सॅनिटायझेशन; ग्रीन मार्कनंतरच दिला जातोय प्रवेश

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या सावटाखाली कुसुमाग्रज नगरीत साहित्य संमेलन होत आहे. संमेलनस्थळी दोन्ही मुख्य प्रवेशव्दारावर दोन दिवसांत १२४ रसिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. रसिकांना लसीची डोस घेतलेले प्रमाणपत्र दाखवल्यानंतर थर्मल स्कॅनिंग, रॅपिड टेस्ट, सॅनिटायझेशन ग्रीन मार्क करून आत सोडले जात आहेत. परिणामी, आत्तापर्यंत तरी संमेलनस्थळी ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला नाही.मात्र, आरोग्य यंत्रणेकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

संमेलनस्थळी दोन्ही मुख्य प्रवेशव्दारांवर आरोग्य समितीतर्फे साहित्यिक, लेखक, कवींसह रसिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस, दुसरा डोस आणि एकाही डोस न घेतलेल्यांची माहिती गोळा केली जात आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्या रसिकांच्या हाताच्या कोणत्याही एका बोटावर ग्रीन मार्क करून आत सोडले जात आहे. तर लक्षणे असलेल्या रसिकांच्या हाताच्या बोटावर रेड मार्क केला जात आहे. नाशिक महापालिका आणि नामको होस्पिस्टलतर्फे औषधे आणि भुजबळ नॉलेज सिटीतर्फे अत्यावश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. आरोग्य समितीतर्फे दोन प्रवेशव्दार आणि मुख्य सभामंडपाजवळ एक असे एकूण तीन बूथ तयार करण्यात आले आहेत. संमेलनस्थळी एखाद्या व्यक्तीची प्रकृती खालावली तर लगेच क्रमांक तीनच्या बूथवर आरोग्य तपासणी करत औषधोपचार केले जात आहेत. प्रत्येक बूथवर आठ डॉक्टर आणि २० नर्सेस आरोग्य सेवा देत आहेत.

पहिला आणि दुसऱ्या डोसची चौकशी

आरोग्य समितीतर्फेरसिकांनी कोणता डोस घेतला आहे, याची चौकशी केली जात आहे. पहिल्या दिवशी एक क्रमांकाच्या बूथवर १०७ रसिकांनी पहिला डोस घेतल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या दिवशी ८४ रसिकांनी पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांना दाखविले. यावेळी ४० रसिकांची टेस्ट करण्यात आली असता सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. दुसऱ्या बूथवर पहिल्या दिवशी १८१ आणि दुसऱ्या दिवशी ९९ रसिकांनी पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवले. दिवसभरात ३५ रसिकांची टेस्ट करण्यात आली. त्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली. पहिल्या दिवशी ४३ रसिकांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली. तर दुसऱ्या दिवशी ८१ रसिकांनी लासा घेतली. लस घेण्यापूर्वी सर्वांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. पहिल्या दिवशी ५१ व दुसऱ्या दिवशी ९५ रसिकांनी रॅपिड टेस्ट केली. सर्व निगेटिव्ह आले.