आरोग्य कर्मचार्‍याचा करोनामुळे मृत्यू

The government report of the victim at Lingdev is also positive

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍याचा नाशिक शहरात करोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मृत कर्मचारी आजारी असल्याने उपचारासाठी विविध ठिकाणी भेट देत होते. त्यातून त्यांना करोनाची लागण झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. अंबोली आरोग्य केंद्र पसिर व त्र्यंबकेश्वर बाजारपेठेत ग्रामस्थांची वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला असलेला कर्मचारी सुपरवायझर पदावर कामाला होता. ते सुमारे एक महिन्यापासून आजारी असल्याने कामावर येत नव्हते. ते नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरातील रहिवाशी आहेत. ११ मे रोजी ते अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांकडे वैयक्तीक कामासाठी आले होते. त्यामुळे अंबोली आणि परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच ते त्र्यंबकेश्वर शासकीय कार्यालयात देखील गेल्याची चर्चा आहे. वरील कर्मचारी आजारी असल्याने उपचारासाठी वेगवेगळया ठिकाणी भेटी देत असतांना बाधीत झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी संबंधित कर्मचार्‍याचा संपर्क आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचे १४ दिवसांचे क्वारंटाइन पूर्ण झाले असून सर्व संपर्कातील व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.