पाणीटंचाईसाठी मनपा सज्ज; १० टँकरची केली सोय

नाशिक : सध्या नाशिक महापालिका सुमारे ५४२ एमएलडी पाणी उचलते. उन्हाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्यानंतर साधारण दोन एमएलडी पाणी उचलावे लागते. शहराला काही प्रमाणात कमी पडत असल्यामुळे महापालिकेला पाण्याची उचल करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक घेतल्यानंतर पाणी उचलण्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, शहरातील सर्व सहा विभागांमध्ये एक याप्रमाणे सहा टँकर सुरू होते. मात्र, गत दोन दिवसांमध्ये नाशिक रोड, पंचवटी, सिडको तसेच पश्चिम विभागामध्ये एक अतिरिक्त पाण्याचा टँकर सुरू करण्यात आल्यामुळे टँकरची संख्या दहा झाली आहे. नागरिकांची आणखी मागणी आल्यावर त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

अनेक भागात कमी दाबाने पाणी

शहरातील वेगवेगळ्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. सिडकोसह शहरातील नववसाहत आणि काही ठिकाणी गावठाण भागातील वसाहतीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. पाण्याची मागणी वाढली असली तरी महापालिका पाण्याचे उचल करण्याच्या क्षमतेत वाढ करणार असल्याचे सांगितले जात आहे.