घरमहाराष्ट्रनाशिकटिंगरी येथे शालेय पोषण आहारात अपहार; जेवणात अळ्या, किचनपर्यंत डुकरांचा संचार

टिंगरी येथे शालेय पोषण आहारात अपहार; जेवणात अळ्या, किचनपर्यंत डुकरांचा संचार

Subscribe

पोषण आहार अधीक्षक श्रीधर देवरे यांनी अचानक दिलेल्या भेटीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस, कठोर कारवाईच्या मागणीसाठी संस्थाचालकांसह ग्रामस्थांनी केले ठिय्या आंदोलन

मालेगाव तालुक्यातील टिंगरी येथील विकास विद्यालयात पोषण आहारात अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, संस्थेचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव यांनीच पालकांसमवेत गुरुवारी (७ फेब्रुवारी) या गैरकारभाराचे बिंग फोडले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आंदोलन पुकारले होते. अखेर पोषण आहार अधीक्षकांनी दोन दिवसांत चौकशी अहवाल देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टिंगरी येथील या खासगी शाळेवर धर्मादाय आयुक्तांनी १८ जुलै २०१६ पासून संचालक मंडळ नियुक्त केले आहे. त्या अंतर्गत अध्यक्ष असलेल्या जाधव यांच्यासह संचालक मंडळाने वेळोवेळी शालेय पोषण आहाराबाबत मुख्याध्यापकांना सूचना केल्या. परंतु, कारभारात सुधारण्या होण्याऐवजी पालकांच्या तक्रारी वाढत गेल्या. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराविषयी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली गेली. मात्र, एवढे होऊनही या प्रकाराची दखल घेतली गेली नसल्याने, संचालक मंडळाने थेट जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे व्यथा मांडली. त्यानुसार पोषण आहार अधीक्षक श्रीधर देवरे यांच्या पथकाने गुरुवारी शाळेला अचानक भेट दिली. तेव्हा धक्कादायक स्थिती निदर्शनास आली. त्यात अनेक पदार्थ मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. शालेय पोषण आहार शिजवण्याच्या ठिकाणापर्यंत थेट डुकरांचा संचार असल्याचे धक्कादायक वास्तवही नजरेस पडले. विद्यार्थ्यांनीदेखील आहारात अनेकवेळा अळ्या आढळून आल्याचे आणि डुक्कर अन्नाला तोंड लावत असल्याचे उपस्थितांना सांगितले. अधीक्षक देवरे यांनीदेखील या आरोपातील तथ्याला दुजोरा दिला. मुख्याध्यापक हे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असून तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह संचालक मंडळ, पालक व विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी दोषींविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

- Advertisement -

या प्रकरणाचा चौकशी अहवाल तयार करून दोन दिवसांत पाठविण्यात येईल, त्यानंतर संचालक मंडळ गुन्हा दाखल करू शकते, असे आश्वासन देवरे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यात शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी वाढल्याने यासंदर्भात शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

एका रात्रीत १० पोती तांदळाची विक्री

शालेय पोषण आहारापोटी आलेल्या १० पोती तांदळाची रातोरात विक्री करण्यात आली. याबाबत संचालक मंडळाला माहिती मिळाली असल्याचे मुख्याध्यापकांना समजल्याने त्यांनी दुसर्‍याच दिवशी ८ ते १० विदयार्थ्यांना तांदूळ वाटप करून हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांदूळ वाटपाचा अधिकार नसतानाही तो वाटप का केला, असा सवाल उपस्थित करून मुख्याध्यापकांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोपही संचालक मंडळ व ग्रामस्थांनी केला आहे.

- Advertisement -
Malegaon1
शाळेतील वस्तूंच्या साठ्याची नोंद घेताना अधिकारी.

पोषण आहाराच्या परस्पर विक्रीचा संशय

शालेय पोषण आहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. शाळेत पटावर २०० ते २२५ विद्यार्थी असले तरीही, प्रत्यक्ष ९० ते १०० विद्यार्थीच हजर राहत होते. मात्र, शासनाकडून हजेरी पटावरील विदयार्थ्यांसाठी पोषण आहार येत असल्याने उर्वरित आहाराची परस्पर विक्री होत असल्याचा संशय आहे. – राजेंद्र जाधव, अध्यक्ष, विकास विद्यालय, टिंगरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -