घर महाराष्ट्र नाशिक शेतमालाच्या हमीभावसंदर्भात पाशा पटेलांची कोंडी

शेतमालाच्या हमीभावसंदर्भात पाशा पटेलांची कोंडी

Subscribe

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उन्नतीचा नवा मार्ग कसा उपलब्ध करून देता येईल, याची माहिती कापूस उत्पादक शेतकर्‍यांना व्हावी, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केल्याचे सांगून पाशा पटेल यांनी शासकीय धोरण, योजनांसंदर्भात माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, कार्यशाळेला उपस्थित शेतकर्‍यांनी शेतमालाच्या हमीभावसंदर्भात बोलण्याचा आग्रह धरला.

कापूस उत्पादक शेतकरी व जिनिंग-प्रेसिंग कंपनीचे प्रतिनिधी यांच्या कार्यशाळेत शेतकर्‍यांनी शेतमालाच्या हमीभावसंदर्भात प्रश्नांची सरबत्ती करत पटेल यांची चांगलीच कोंडी केली. मात्र, त्यांनी शेतकर्‍यांसमोर हात जोडून मूळ प्रश्नांना बगल दिली. भावनिक उत्तरे देऊन त्यांनी वेळ मारून नेल्याने शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाला.राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन केले होते.

पाशा पटेलांनी टोलवले प्रश्न

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उन्नतीचा नवा मार्ग कसा उपलब्ध करून देता येईल, याची माहिती कापूस उत्पादक शेतकर्‍यांना व्हावी, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केल्याचे सांगून पाशा पटेल यांनी शासकीय धोरण, योजनांसंदर्भात माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, कार्यशाळेला उपस्थित शेतकर्‍यांनी शेतमालाच्या हमीभावसंदर्भात बोलण्याचा आग्रह धरला. ‘आपण राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहात. शेतमालाचा हमीभाव का वाढत नाही. शेतकर्‍यांच्या अडचणींसंदर्भात शासनस्तरावर का कार्यवाही होत नाही‘, अशा प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे पटेल यांची चांगलीच पंचाईत झाली. शेतकर्‍यांचा रोष वाढत गेल्याने पाशा पटेल यांनी दोन्ही हात जोडत शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर भावनिक उत्तरे दिली. शेतकरी उत्पादक कंपन्या भारतातील टेक्सटाईल इंडस्ट्रीशी जोडून शेतकर्‍यांना चार पैसे मिळवून द्यावे, असा माझा हेतू आहे. आज मी कापूस या विषयासंदर्भात बोलायला आलो आहे. याच विषयावर आपण चर्चा करूया. एकाच वेळी 10 विषय मांडले तर एकही विषय मार्गी लागत नाही. त्यामुळे कार्यशाळा आताच गुंडाळायची का? कृपा करून कापसावरच बोलूया, असा पवित्रा घेत त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न टोलवून लगावले.

उत्पादनवाढ सोडा; हमीभावावर बोला

- Advertisement -

कार्यशाळेत यावल तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी दिगंबर बडगुजर यांनी पटेल यांना प्रश्न विचारताना सांगितले की, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह तुम्हाला आणि शासकीय अधिकार्‍यांनाही वाटते की शेतकर्‍यांचे भले व्हावे. मग आज शेतकर्‍यांच्या विषयावर बोला. शेतकरी 50 क्विंटल कापूस पिकवता येतो. तरीही त्याच्यावर आत्महत्येची वेळ का येते? शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, यासंदर्भात तुम्ही बोला. जर तसे झाले तर माझ्यासह सर्वच शेतकरी आपल्या पाठीशी आहेत, असे सांगत बडगुजर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पटेल म्हणाले, शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी मी आयुष्यभर जी झक मारली ना म्हणून सरकार मला म्हटले तू बोंबलत होता ना. आता तुला राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केले आहे. आता तूच करून दाखव. अध्यक्ष झाल्याने माझी जबाबदारी बदलली आहे. तुमच्यापेक्षा माझे टेन्शन खूप आहे. देशातील शेतकर्‍यांसाठी काम केले म्हणून मी जातीने मुसलमान असूनही शेतकर्‍यांनी मला सलाम केला. माझी नियत, विचार शेतकर्‍यांप्रती चांगले होते. म्हणूनच शेतकर्‍यांनी जात-धर्म विसरून माझ्यावर प्रेम केले, अशी भावनिक उत्तरे पटेल यांनी दिली.


तुम्ही हे वाचलंत का? – नाशिकमध्ये कांदा दर वधारले

मी सरकारमध्ये बसून सोल्यूशन देतोय

माझा शेतकर्‍यांप्रती असलेला कळवळा कमी झालेला नाही. विरोधी पक्षात असताना आरोप करावा लागतो. तर सरकारमध्ये आल्यावर सोल्यूशन द्यावे लागते. मी आता सरकारमध्ये बसून सोल्यूशन देण्याचे काम करत आहे. संघर्षाचे रुपांतर आता सोल्यूशनमध्ये झाले आहे. माझी शेतकर्‍यांविषयी असलेली भावना पूर्वीचीच आहे आणि मरेपर्यंत तीच राहील, असेही पाशा पटेल म्हणाले.

- Advertisement -

या कार्यशाळेला आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी शास्त्रज्ञ डॉ.बी.डी. जडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्ष लोखंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनींचे प्रतिनिधी, जिनिंग-प्रेसिंग कंपनींचे संचालक, प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -