गुन्हेसत्र थांबेना : त्रिमूर्ती चौकातील एकाचा संशयास्पद मृत्यू

नाशिक : नाशिक शहरातील खुनांची मालिका थांबता थांबत नसून रविवारी सकाळी त्रिमूर्ती चौकातील डॉ. हेडगेवार नगर येथे चायनीज विक्रेता तरुण रहात्या घरातच मृतावस्थेत आढळून आला आहे. प्राथमिक तपासात मारहाणीमुळे झालेल्या गंभीर जखमेतून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कैलास साबळे (वय ३८) हा तरुण रात्री बाहेर गेलेला होता. पहाटे ४ वाजेच्या दरम्यान तो डॉ. हेडगेवार चौक येथे रस्त्याच्या बाजूला गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. मित्राने त्याला ४.३० दरम्यान घरी आणून सोडले. त्यावेळी तो जखमी होता. डोक्यातून रक्त येत असल्याने पत्नीने त्याच्या जखमेवर हळद लावली होती. त्यानंतर सकाळी तो घरातच मृतावस्थेत आढळला.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली असता कैलास साठे याच्या संपूर्ण शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या.

शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मयत कैलास याचे तिबेटीयन मार्केट मध्ये चायनीज पदार्थांचे दुकान असून तो सतत मद्यपान करीत असल्याची तसेच घरात नेहमी भांडणे होत असल्याची माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली. त्याच्या पश्चात पत्नी व एक लहान मुलगी आहे.