परिसरातील भाई आहे, कोणी आडवे आल्यास ठार मारीन

दारुसाठी धिंगाणा घालणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

Crime
प्रातिनिधिक फोटो

मी परिसरातील भाई आहे, मला अन्या सांड म्हणतात, दारुसाठी पैसे द्या, कोणी आडवे आल्यास त्याला फाडून टाकेन, माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारीन, अशी धमकी धमकी देत सराईत गुन्हेगारा कोयता हातात घेऊन धिंगाणा घातला. ही घटना रविवारी (दि.३) सायंकाळी ३ वाजता पेठ रोड, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अनिल दत्तू पवार ऊर्फ अन्या सांड (रा.सुदर्शन कॉलनी, पेठरोड, पंचवटी) यास अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल पवार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. महिला व तिचा मुलगा घराच्या दिशेने पायी जात होते. त्यावेळी अनिल पवार याने मुलास विनाकारण शिवीगाळ केली. तो दरवाजा तोडून जबरदस्तीने घरात घुसला. त्याने कोयत्याचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर तो घराबाहेर गेला. त्याने हातगाडीवर भाजीपाला विक्री करणार्‍या महिलेस दारु पिण्यासाठी पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने महिलेस कोयत्याचा धाक दाखवत विनयभंग केला. त्यानंतर तो एका किराणा दुकानात घुसला. त्याने दुकानातील महिलेकडे दारुसाठी पैसे मागितले. महिलेने त्यास पैसे देण्यास नकार दिला असता त्याने महिलेस शिवीगाळ करुन दुकानातील काउंटरला लाथ मारुन कोयत्याने तोडफोड केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डंबाळे करत आहेत.