घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रझाडाझडती पालिकेतील मिस्टर इंडियांची

झाडाझडती पालिकेतील मिस्टर इंडियांची

Subscribe

नाशिक महापालिकेतील दांडीबहाद्दरांवर प्रशासनाने आता ‘तिरपी नजर’ टाकली असून वारंवार गैरहजर राहणारे आणि हजेरी लावल्यानंतर मध्येच ‘गायब’ होणार्‍या कर्मचार्‍यांची झाडाझडती सुरु केली आहे. अशा कर्मचार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे धोरण आता अवलंबण्यात येणार आहे.

महापालिकेत अनेक कर्मचारी ‘मिस्टर इंडिया’सारखे असतात. कामाच्या वेळेत हे कर्मचारी ‘गायब’ असतात. संबंधित कर्मचार्‍यांची नियमीत हजेरी असते. मात्र कामाच्या वेळेत ही मंडळी खासगी कामे करीत बसतात आणि कार्यालय सुटण्याच्या वेळेत पुन्हा बायोमॅट्रिक्स हजेरी लावतात. अशा कर्मचार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे. त्याचप्रमाणे काही कर्मचारी पूर्वसूचना न देता महिना-महिना गैरहजर राहतात. कामावर आल्यावर मात्र वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन पुन्हा रुजू होण्याचा प्रयत्न करतात. अशा कर्मचार्‍यांची रजा थेट मंजुर न करता ती वैद्यकीय समितीसमोर ठेवण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या एका महिला कर्मचार्‍याच्या बाबतीत हे धोरण अवलंबल्याने अन्य कर्मचार्‍यांवर आता वचक बसला आहे.

- Advertisement -

कामचुकार कर्मचार्‍यांना सभापतींचा लगाम-

महापालिकेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या काही कर्मचार्‍यांना अजूनही दैनंदिन कामकाज येत नाही. अनेकांना इंग्रजीचा गंध नाही. तर काहींना साधे पत्र, प्रस्ताव, ठराव लिहिता येत नाही. या कर्मचार्‍यांची उपयुक्तता शून्य असल्याने त्यांना कामे देण्यास अधिकारी वर्गही धजावत नाही. अशा कर्मचार्‍यांवर ‘वॉच’ ठेवण्याचे काम आता महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती भामरे यांनी हाती घेतले आहे. कामाच्या वेळेत कोण खासगी कामासाठी कार्यालय सोडून बाहेर जाते तसेच कोणते कर्मचारी कामचुकारपणा करतात याचा आढावा आता त्या रोजच घेत असतात. हे काम प्रशासनाचे असले तरीही सभापतींच्या माध्यमातून ते होत असल्यामुळे प्रशासनातील अधिकारीही सभापतींना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -